सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट २.६५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:29+5:302021-09-14T04:14:29+5:30
पुणे : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहरात १४११ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाले. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.६५ टक्के इतका ...
पुणे : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहरात १४११ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाले. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.६५ टक्के इतका नोंदविला गेला आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांनी गर्दी करून कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवू नयेत, यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी मागील वर्षीप्रमाणे पुन्हा उद्रेक होऊ नये, यासाठी नागरिकांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर आणि गर्दी टाळणे या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
कोरोना विषाणू काही काळ सुप्तावस्थेत जातो आणि अचानक झपाट्याने संसर्ग पसरवतो, हे मागील दोन लाटांमधून जगाने अनुभवले आहे. मागील वर्षी गणेशोत्सवानंतर शहरात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आणि पहिल्या लाटेचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच सध्या संसर्ग आटोक्यात असला तरी गणेशोत्सवात नियम मोडून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची चूक करू नये, असा इशारा वैैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ६ ते १२ सप्टेंबर या कालावधीत ५३ हजार चाचण्या झाल्या, तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्या घटल्याचे दिसून आले. शहरात १४११ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाले. आठवडाभरात कोरोनामुळे २८ रुग्णांचा मृत्यू झाला. आठवड्यात सर्वांत कमी १३४, तर सर्वांत जास्त २५७ रुग्णांचे निदान झाले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची आठवड्यातील संख्या १६०० इतकी आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात पॉझिटिव्हिटी रेट २.५३ टक्के होता.
------
आठवडा चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट
२-८ ऑगस्ट ५६,०५७ १४८१ २.६४
९-१५ ऑगस्ट ६०,७७६ १५४४ २.५४
१६-२२ ऑगस्ट ५७,५०४ १४१६ २.४६
२३-२९ ऑगस्ट ५६,४२६ १७३१ ३.०६
३० ऑग.-५सप्टें. ६१,३७४ १५५७ २.५३
६-१२ सप्टेंबर ५३,०४८ १४११ २.६५
----
शहरातील स्थिती :
शहरात आतापर्यंत ३२ लाख ३८ हजार ६९४ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैैकी ४ लाख ९८ हजार २९० नागरिक कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यापैैकी ४,८७,४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८१ टक्के इतके आहे. शहरात आतापर्यंत ८९८१ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २०५ कोरोनाबाधितांची परिस्थिती गंभीर असून, २७६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १९०५ इतकी आहे.
----------