दुसऱ्या महायुद्धाचे चित्रण होणार जतन
By Admin | Published: February 20, 2016 01:08 AM2016-02-20T01:08:18+5:302016-02-20T01:08:18+5:30
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या रक्तरंजित इतिहासाचे तब्बल तीस तासांचे दुर्मिळ छायाचित्रण नॅशनल फिल्म अर्काईव्ह (एनएफएआय) मार्फत जतन करण्यात येणार आहे.
पुणे : दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या रक्तरंजित इतिहासाचे तब्बल तीस तासांचे दुर्मिळ छायाचित्रण नॅशनल फिल्म अर्काईव्ह (एनएफएआय) मार्फत जतन करण्यात येणार आहे. या निमित्ताने भारतीय फौजांनी दुसऱ्या महायुद्धात दिलेल्या योगदानाचा ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी सुरक्षित राहणार आहे.
दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय सैन्य ब्रिटिशांसाठी लढत होते. विविध ठिकाणी लढल्या गेलेल्या या युद्धाचे चित्रीकरण देखील करण्यात आले. आजपर्यंत संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र दल चित्रपट आणि फोटो विभागाकडे हे दुर्मिळ चित्रीकरण होते. यू फॉरमॅटमध्ये असलेले हे चित्रीकरण योग्य त्या तापमानात आणि सुयोग्य आद्रतेमधे जतन करण्यासाठी एनएफएआयला देण्यात आले आहे. यामध्ये इंडिया स्ट्राईक्स, फ्रॉम इंडिया टू ट्यूनिस, बॅटल आॅफ ब्रिटन, फायर ओव्हर लंडन, अ डे विथ इंडियन ट्रूप्स इन इजिप्त, जॉनी गुरखा, बलूच रेजिमेंट, मद्रास गार्डस, महात्मा गांधी, सरदार पटेल, महंमद अली जीना आणि इतर नेत्यांच्या दुर्मिळ चित्रीकरणांचा समावेश
असल्याची माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
(प्रतिनिधी)