धर्मनिरपेक्षता आयात केलेली नाही
By admin | Published: March 24, 2017 04:20 AM2017-03-24T04:20:59+5:302017-03-24T04:20:59+5:30
‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द पाश्चात्त्य विचारसरणीतून आला आहे, हा समज चुकीचा आहे.
पुणे : ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द पाश्चात्त्य विचारसरणीतून आला आहे, हा समज चुकीचा आहे. साडेतीन हजार वर्षांपूर्वी ॠग्वेदात धर्मनिरपेक्षतेसाठी ‘बहुविविधता’ हा शब्द रूढ होता, भारतीय संस्कृतीतच या शब्दाची मूळं रुजलेली आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हे शब्द आपण कुठूनही आयात केलेले नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे माजी खासदार आणि पुरोगामी विचारवंत आरिफ महंमद खान यांनी धर्माचे राजकारण करणाऱ्यांवर टीका केली.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त अल्मास शेख, तबस्सुम इनामदार, शमीम मडकी, सायराबानो शेख, दिलशाद मुजावर यांचा सत्यशोधक फातिमाबी शेख स्मृतिगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार राज काझी यांना स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी खान बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर फॉर प्रमोशन आॅफ डेमॉक्रसी अँड सेक्युलॅरिझमचे अध्यक्ष प्रा. जहीर अली, भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापिका जाकिया सोमण, स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. नूर जहीर, प्रा. शमशुद्दीन तांबोळी उपस्थित होते.
आरिफ खान म्हणाले, कुराणात ‘अवामून’ या शब्दाचा अर्थ हा समानतेशीच निगडित आहे, मात्र कुराणात स्त्री आणि पुरुष दोघांच्या भूमिका निश्चित केलेल्या आहेत. तिची जबाबदारी ही घर चालविणे नाही, तर ती पुरुषांचीच आहे. सीमेवर लढायला महिलांना पाठवणार का? पण महिला पायलट विमानातून बाँब नक्कीच फेकू शकतात. ही असमानता मानली जाणार का? प्रत्येक धर्म आपली विचारसरणी पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुस्तकाच्या माध्यमातून ती मांडली तर बिघडले कुठे? अशी दुटप्पी वृत्ती असू नये.
राजकारण्यांना नागरिकांची मते नको आहेत तर समाजाची मते हवी आहेत. कारण नागरिकांची मते मिळवण्यासाठी काम लागते. धर्माची मते मिळविण्यासाठी केवळ भीती निर्माण करावी लागते. शहाबानो प्रकरणात सांप्रदायिकतेला सन्मान मिळाल्यानेच मी खासदारकीचा राजीनामा दिली असल्याची टिप्पणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)