सेक्युरिटीज प्रा. लि. कंपनीचे बनावट खाते; तब्बल सव्वा कोटींची फसवणूक, दोन एजंटवर गुन्हा
By नितीश गोवंडे | Published: May 19, 2024 02:55 PM2024-05-19T14:55:23+5:302024-05-19T14:55:47+5:30
कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून कंपनीच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून १ कोटी २८ लाख रुपये घेतले
पुणे : कल्याणी नगर येथील प्रॉफीटमार्ट सिक्युरिटीज कंपनीच्या नावाने बँकेत बनावट खाते उघडून ग्राहकांकडून त्यामध्ये पैसे घेऊन १ कोटी २८ लाख रुपयांची कंपनीची व ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या दोन एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी ग्राहकांना कंपनीची गॅरंटी रिटन देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रॉफिटमार्ट सेक्युरिटीज प्रा. लि. कल्याणी नगर व नाशिक येथे घडला आहे.
याबाबत सुनिलकुमार सत्यकुमार सिंग (३९, रा. मगरपट्टा सिटी, कासाफेलीस, हडपसर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रोहित सतीश बोडके (रा. शिवाजीनगर, नांदगाव, मनमाड, नाशिक) आणि अनिल गोपीचंद चव्हाण (रा. वाघदारदी रोडी, मनमाड, नाशिक) या एजंटवर फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित बोडके हा फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये अधिकृत एजंट म्हणून नोकरीला होता. त्याने त्याचा साथीदार अनिल चव्हाण याच्यासोबत संगनमत करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीच्या नावाने एचडीएफसी बँकेत बनावट खाते उघडले. आरोपींनी कंपनीच्या सेबी गाईडलाईन्सच्या सूचनांचे उल्लंघन केले. कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून कंपनीच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून १ कोटी २८ लाख रुपये घेतले. आरोपींनी कंपनीची परवानगी न घेता ग्राहकांना फिर्यादी यांच्या कंपनीची गॅरंटी रिटर्न दिली. रोहित बोडके व अनिल चव्हाण यांनी फिर्यादी यांच्या कंपनीची व कंपनीच्या अनेक ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तोडकरी करत आहेत.