चाकणमधील एटीएम केंद्रांची सुरक्षा सीसीटीव्हीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:08 AM2021-07-23T04:08:18+5:302021-07-23T04:08:18+5:30
चाकण : सर्वसामान्यांना स्वयंचलित यंत्रणेमार्फत कोणत्याही वेळी पैसे काढण्याची सुविधा देणाऱ्या बँकांनी ही रक्कम ज्या एटीएम केंद्रांमार्फत दिली जाते. ...
चाकण : सर्वसामान्यांना स्वयंचलित यंत्रणेमार्फत कोणत्याही वेळी पैसे काढण्याची सुविधा देणाऱ्या बँकांनी ही रक्कम ज्या एटीएम केंद्रांमार्फत दिली जाते. त्यांच्या सुरक्षिततेकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे. चाकण शहरासह औद्योगिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची शेकडो एटीएम केंद्रे आहेत. यातील बहुतांश अधिक केंद्रांवर सुरक्षारक्षकच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून, लाखों रुपयांची सुरक्षा फक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भरवश्यावर आहे.
चाकण परिसरातील काही एटीएम केंद्र चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांची रक्कम लुटून नेली आहे. तर काही एटीएम केंद्रे फोडता आले नाही. यामुळे बँकांनी केंद्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले परंतु, सुरक्षारक्षक तैनात नसल्याने आणि आलार्म सुविधा लावली नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी चोरटे एटीएम केंद्रात सहजपणे प्रवेश करत असल्याचे आजपर्यंत घडलेल्या घटनांमधून निदर्शनास आले आहे. यासाठी सर्वच बँकांनी एटीएम केंद्राच्या सुरक्षतेसाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नुकतेच चाकण औद्योगिक वसाहतीमधील भांबोली येथील एटीएम मशीन चक्क बॉम्बसदृश वस्तूने स्फोट घडवून त्यातील तब्बल २८ लाख रुपयांची चोरी झाल्याने पुन्हा एकदा एटीएम केंद्रच्या सुरक्षेतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. चाकण परिसरात आतापर्यंत चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन कट करून फोडणे किंवा मशिनच चारचाकी गाडीला बांधून खेचून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच बॉम्बसदृश वस्तूने एटीएम मशिनचा स्फोट घडवून त्यातील रक्कम चोरली गेली आहे. या घटनेमुळे पोलिसांची तपासाची दिशा बदलावी लागणार आहे. अशा एटीएम फोडीच्या घटना परराज्यात घडल्या असून पुणे जिल्ह्यात चार दिवसांच्या अंतराने ही दुसरी घटना आहे.
एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक, आलार्म आदी सुरक्षा व्यवस्था नेमण्याच्या लेखी सूचना पोलिसांकडून बँकांना देण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे काहींनी दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत आहे.
अरविंद पवार, पोलीस निरीक्षक, महाळुंगे पोलिस चौकी.
220721\20210721_100503.jpg
भांबोली येथील फोडलेले एटीएम केंद्र