बारमध्ये बाऊन्सरने केला गोळीबार ; बिल देण्यावरुन झाला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 02:14 PM2019-12-25T14:14:38+5:302019-12-25T14:19:48+5:30
बिल देण्यावरुन झालेल्या वादातून हाॅटेलमधील बाॅऊंसरने गाेळीबार केल्यामुळे पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : शहराच्या मध्य वस्तीतील एका हॉटेलमध्ये मद्यपान व जेवण केल्यानंतर बिल देण्यावरुन हॉटेलमधील कर्मचारी व व्यवस्थापकांशी ग्राहकांनी भांडणे केली.यावेळी वाद वाढल्याने हॉटेलमधील बाऊन्सरने पिस्तुलातून हवेत गोळीाबर केला. ही घटना मंगळवार पेठेतील हॉटेल वसंत येथे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. समर्थ पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या बाऊन्सरसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिमाशंकर तिवारी असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. तर तीन ग्राहक व हॉटेलमधील ९ कर्मचाऱ्यांचा गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रविकांत कदम यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील हॉटेल वसंत बार येथे तीन ग्राहक आले होते. त्यांनी मद्यपान व नंतर जेवण केले. त्याचे बिल देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा या ग्राहकांनी हॉटेलमधील टेबलची मोडतोड केली. त्यावरुन हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या ग्राहकांना मारहाण केली. हॉटेलमध्ये सुरक्षिततेच्या नावाखाली ठेवलेल्या महिमाशंकर तिवारी हा बाऊन्सर तेथे आला. त्याने वादामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यातील वाद आणखी वाढल्याने तिवारी याने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत एक फायर केले. त्यामुळे त्यांच्यातील वाद थांबला. त्यांनी तिघा ग्राहकांना पकडून ठेवले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून कोणाच्याही जिवितास धोका नसताना गोळीबार करुन उपस्थितांची सुरक्षितता धोक्यात येईल अशा रितीने गोळीबार केला. तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मारहाण केली.ग्राहकांनी खुर्च्या, टेबलांची मोडतोड केल्यावरुन पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे.