पुणे महापालिकेची सुरक्षा वाऱ्यावर; कायम सुरक्षारक्षकांची ४०० पदे रिक्त, खासगीला आठशेंची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:12 AM2023-07-24T10:12:13+5:302023-07-24T10:12:29+5:30
पुणे महापालिकेत २०१० सालापासून कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची भरती झालेली नाही
राजू हिंगे
पुणे : पुणे महापालिकेत ३४ गावांचा समावेश झाल्यामुळे भौगोलिक क्षेत्रफळाने पुणे ही राज्यातील सर्वांत मोठी महापालिका आहे; पण या महापालिकेत २०१० पासून कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांच्या ४०० जागा रिक्त आहेत. त्याशिवाय पालिकेच्या विविध आस्थापनांची सुरक्षा पाहण्यासाठी ८०० खासगी सुरक्षारक्षकांची गरज आहे. त्यामुळे पालिकेच्या विविध आस्थापनांवर सुरक्षारक्षक नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर आहे.
महापालिकेंतर्गत येणारी मुख्य इमारत, शाळा, उद्याने, नाट्यगृहे, क्षेत्रीय कार्यालये, पाण्याच्या टाक्या, जलतरण तलाव, ॲमिनेटी स्पेसच्या जागा यांसारख्या सुमारे ५०० आस्थापना आहेत. सध्या पुणे महापालिकेत खासगी सुरक्षारक्षकांची संख्या १ हजार ६४०, तर कायमस्वरूपी ३२०, असे एकूण १ हजार ९६० सुरक्षारक्षक आहेत; पण पालिकेच्या आस्थापनांची संख्या विचारत घेता सुरक्षारक्षकांची संख्या कमी अपुरी पडत आहे. महापालिकेत २०१० सालापासून कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांच्या ४०० जागा रिक्त आहेत, असे पुणे महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले.
आजारपणातही बदली सुरक्षारक्षक देता येत नाही
पुणे महापालिकेत खासगी आणि कायमस्वरूपी अशा सुरक्षारक्षकांची संख्या १ हजार ९६० आहे; पण पालिकेच्या आस्थापनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांची ही संख्या अत्यंत कमी पडत आहे. त्यामुळे एखादा सुरक्षारक्षक आजारी पडल्यास बदली सुरक्षारक्षक देता येत नाही. त्यामुळे ८०० खासगी सुरक्षारक्षक तातडीने भरावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
महिला सुरक्षा अधिकारी नेमा
पालिकेत महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यात सुरक्षारक्षकामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. आता सुरक्षाव्यवस्थेत तृतीयपंथीयाचा समावेश केला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून पालिकेत एक महिला सुरक्षा अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
एक सुरक्षा अधिकारीपद रिक्त
पुणे महापालिकेत तीन सुरक्षा अधिकारीपदे आहेत. त्यात राकेश विटकर हे सुरक्षा अधिकारी आहेत. कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांच्याकडे सुरक्षा अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार आहे. एक सुरक्षा अधिकारीपद रिक्त आहे. पालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिकारीपदी रमेश शेलार आहे; पण त्यांच्याकडे पर्यावरण विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्याकडे पालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.