तळजाई टेकडीची सुरक्षा रामभरोसे; १०८ एकर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अवघे १२ सुरक्षा रक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 08:48 AM2023-04-24T08:48:26+5:302023-04-24T08:50:02+5:30

टेकडीवर दरवर्षी आगीच्या १५ ते २० घटना...

Security of Taljai Hill in danger Only 12 security guards to protect the 108 acre area | तळजाई टेकडीची सुरक्षा रामभरोसे; १०८ एकर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अवघे १२ सुरक्षा रक्षक

तळजाई टेकडीची सुरक्षा रामभरोसे; १०८ एकर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अवघे १२ सुरक्षा रक्षक

googlenewsNext

- राजू हिंगे

पुणे : तब्बल १०८ एकर क्षेत्रात पसरलेल्या तळजाई टेकडीचा परिसर दारूच्या पार्ट्या करणाऱ्यांसाठी नंदनवन ठरत आहे. या टेकडीवर टवाळखोरांसह गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. यासोबतच तळजाई टेकडीवर प्रेमी युगुल भेटण्यासाठी येतात आणि दिवसभर येथेच रमतात. अशा कारणांमुळे या टेकडीवर छेडछाड, बलात्कार, खून अशा गुन्ह्यांचे प्रकार वाढले आहेत. असे असतानाही महापालिकेने या टेकडीच्या सुरक्षेसाठी केवळ १२ सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यामुळे तळजाई टेकडीची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच स्पष्ट होत आहे.

तळजाई टेकडीच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याला पुणेकरांच्या प्रयत्नातून दहा हजार वृक्षांचे कोंदण लाभले आहे. विविध प्रकारचे देशी वृक्ष लावून तळजाई टेकडी हिरवीगार झाली आहे. या टेकडीवर मोठ्या संख्येने नागरिक सकाळ आणि सायंकाळी फिरण्यासाठी येतात. त्याचबरोबर या टेकडीवर प्रेमी युगुले एकांत आणि फिरण्यासाठी येतात. येथेच काहीजण आडोशाला बसून सिगारेट ओढतात. अनेक ठिकाणी दारू-बिअरच्या बाटल्या दिसून येतात. अनेकदा येथे प्रेमी युगुलांना लुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र येथे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले नाहीत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी तरतूद

तळजाई टेकडीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी पालिकेच्या २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

टेकडीवर दरवर्षी आगीच्या १५ ते २० घटना

तळजाई टेकडीवर दरवर्षी साधारणपणे १५ ते २० आगीच्या घटना घडत आहेत. ही आग अनेकदा सिगारेट ओढणाऱ्यांकडून कधी जाणीवपूर्वक तर कधी अनवधानाने लागते. दरवर्षी उन्हाळ्य़ात आगीच्या घटना घडतात. या आगीमुळे तळजाई टेकडीवरील वनसंपदेचे नुकसान होते.

सुरक्षा रक्षकांची संख्या कमी का केली ?

तळजाई टेकडीवरील डोंगर माथा, डोंगर उताराची जागा मिळविण्यासाठी पालिकेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागते. त्यानंतर ही जागा पालिकेला मिळाली आहे. या टेकडीवर २०१७ पर्यंत पालिकेचे ४० सुरक्षा रक्षक होते. पण आता अवघे १२ सुरक्षा रक्षक येथे तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. पूर्वी जास्त सुरक्षा रक्षक होते मग आता ही संख्या कमी का केली? असा सवाल राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.

असा दिला न्यायालयीन लढा

तळजाई टेकडीवर १९४२ निवासी प्लॉटचा लेआऊट मंजूर होता. १२० एकरमध्ये १८६ प्लॉट होते. त्यापैकी ११२ निवासी आणि उर्वरित प्लॉट सार्वजनिक सुविधांसाठी राखीव होते. पण या प्लॉटवर काही झाले नाही. त्यामुळे शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्यात या तळजाई टेकडीवर हिलटॉप हिल स्लोप झोन पडला. त्यानंतर तळजाई टेकडीचा विकास करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना सुभाष जगताप यांनी २००२-०३ साली आर्थिक तरतूद केली. त्यानंतर तळजाई टेकडीचे भूसंपादन पालिकेने सुरू केले. पण ही भूसंपादन प्रक्रिया कायद्यातील कलमानुसार झाली नाही. त्यामुळे ही भूसंपादन प्रक्रिया उच्च न्यायालयाने रद्द केली. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी संमिश्र निकाल दिला. त्यावर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावेळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन या जागेचे भूसंपादन योग्य पद्धतीने झाल्याचा निर्णय देण्यात आला. त्यावर पुणे महापालिकेने १०८ एकर जमिनीसाठी २७ कोटी भरले.

तळजाई टेकडीवरील १०८ एकर क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी पालिकेचे दिवसा १० आणि रात्री दोन सुरक्षा रक्षक आहेत. या टेकडीवरील सुरक्षा रक्षकांच्या संख्येत आगामी काळात वाढ करण्यात येईल

- राकेश विटकर, प्रभारी सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका

Web Title: Security of Taljai Hill in danger Only 12 security guards to protect the 108 acre area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.