माय पुणे सेफद्वारे महिलांना सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:29+5:302021-09-17T04:16:29+5:30
पुणे : महिलांसाठी पुणे शहर सुरक्षित करण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. गुन्हेगारांना कडक शासन करण्याबरोबरच गुन्हा घडूच नये, ...
पुणे : महिलांसाठी पुणे शहर सुरक्षित करण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. गुन्हेगारांना कडक शासन करण्याबरोबरच गुन्हा घडूच नये, यासाठीही वातावरण तयार केले जात आहे. यासाठी पुणे पोलिसांनी माय सेफ पुणे हे ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे पुणे महिलांसाठी सुरक्षित होण्यासाठी नवे पाऊल पडले, असे आश्वासन पुण्याचे पोलीस आयु्क्त अमिताभ गुप्ता यांनी लोकमत ‘ती’चा गणपती मंडळाच्या व्यासपीठावर दिले.
लोकमत ‘ती’चा गणपती मंडळातर्फे दर वर्षी महिला सुरक्षेचा जागर करण्यासाठी मिडनाईट बाईक रॅली काढली जाते. कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी ही रॅली काढण्यात आली नाही. पण महिला सुरक्षेचा जागर करत पुण्यात काही दिवसांत घडलेल्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त करण्यासाठी लोकमत ‘ती’चा गणपती मंडळाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून पुण्यातील मान्यवर महिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयात अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, मनसेच्या नेत्या रुपाली पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्ष डॉ. माया तुळपुले, संगीता ललवानी, कल्याणी दर्डा, रुपाली बालवडकर, सिंझानिया रॉड्रिंग्ज, कॅरोलीन ऑडोईर डी व्हॉल्टर, स्मिता मुखर्जी, डॉ. निवेदिता एकबोटे, आर. जे. अपूर्वा यांचा यामध्ये समावेश होता. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई आणि लोकमत ‘ती’चा गणपती मंडळाच्या अध्यक्ष सुषमा नेहरकर-शिंदे यांनी स्वागत केले.
या वेळी महिलांनी पुण्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत विविध मुद्दे मांडले. पोलीस आयु्क्तांनी पुणे पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देत संवाद साधला. पोलिसांसोबतच समाजातील विविध घटकांनीही महिला सुरक्षेसाठीच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पुण्यातील बलात्काराच्या घटनेची माहिती देताना कशा पध्दतीने पोलिसांनी आरोपींचा छडा लावण्यात यश मिळविले याचीही माहिती दिली.
१०० नंबरसह ११२ नंबरही होणार कार्यरत
पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचा क्रमांक अनेक वेळा उचलला जात नाही, अशी तक्रार महिलांनी केली. मात्र, फोन केल्यावर तातडीने पोलीस पोहोचतात. त्यांच्याकडून तातडीने मदत केली जाते, असेही महिलांनी सांगितले. यासाठी आता १०० नंबरसह ११२ हा नंबरही पुणे पोलिसांकडून कार्यरत केला जाणार आहे. या नंबरवर आलेला कॉलही नियंत्रण कक्षाकडे जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले.
१४ पैकी कोणालाही वाटत नाही हे चुकीचे आहे
वानवडी येथील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर १४ जणांनी अत्याचार केला. पण त्यातील एकालाही वाटले नाही की आपण करतोय ते चुकीचे आहे. मी हे करणार नाही. किंवा आपण हे पोलिसांना कळवावे, असे कोणाला वाटले नाही. त्यामुळे समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. यासाठी खूप गंभीरपणे प्रयत्न करावे लागतील. समाजातील ही वृत्ती बदलण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांची आवश्यकता असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.