‘कृषिक’ पाहण्यासाठी परराज्यातूनही गर्दी
By admin | Published: January 23, 2017 02:16 AM2017-01-23T02:16:30+5:302017-01-23T02:16:30+5:30
माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये भरलेल्या कृषिक प्रदर्शनात चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
बारामती : माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये भरलेल्या कृषिक प्रदर्शनात चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विविध राज्यांतूून आलेले शेतकरी, परदेशी पाहुणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून आलेले शेतकरी आदींनी या प्रदर्शनास भेट दिली.
या वेळी शेतकऱ्यांना आधुनिक स्वयंचलित यंत्रणेच्या साहाय्याने पाण्याचा व खताचा योग्य प्रमाणात वापर कसा करावा, याची माहिती मिळाली. डच तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, रोपे तयार करण्यासाठी कलम तंत्रज्ञानाचा वापर, उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृह, शेडनेट हाऊस प्रात्यक्षिक, उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा, स्वयंचलित खत व पाणी व्यवस्थापन यंत्रणा, काढणीपश्चात तंत्रज्ञान व बाजारपेठेची माहिती, स्वयंचलित हवामान केंद्र याबाबत शेतकऱ्यांनी माहिती घेतली.
ट्रस्टच्या डेअरी विभागातर्फे सर्फेस टँकमध्ये मुरधास बनवण्याचे तंत्रज्ञान, बॅगमध्ये मुरघास बनविणे, मुक्तसंचार गोठा पद्धती, आॅस्ट्रेलियन बोअर शेळ्या, दोन पिल्ले देणाऱ्या नारीसुवर्णा मेंढ्या, गवताचे बेल बनविण्याची मशिन, शेतातील पाचट गोळा करण्याची मशीन, मका व कडवळ चारा पिकांची कापणी करणारी मशिन इत्यादींचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते.
सेंद्रिय परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेला डाळिंब प्रात्यक्षिक प्लॉट पाहून शेकडो शेतकरी आश्चर्यचकित झाले होते. विविध भागांतील शेतकऱ्यांनी डांळिब, द्राक्ष, केळी निर्मितीक्षम दर्जा तयार करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली. कृषिक प्रदर्शनाचे आयोजन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी केले होते. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शाकिर अली सय्यद, संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव यांसह विविध विभागप्रमुख, कर्मचारी यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)