कारगिल विजयदिनानिमित्त ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ पाहा माेफत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 05:12 PM2019-07-25T17:12:05+5:302019-07-25T17:16:16+5:30
कारगिल विजयदिनानिमित्त उरी द सर्जिकल स्ट्राईक सिनेमा पाहता येणार माेफत
पुणे : कारगिल विजयदिनानिमित्त उरी - द सर्जिक स्ट्राईक हा सिनेमा माेफत दाखविण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. तरुणांमध्ये सैैन्याबद्दलचा अभिमान वृध्दिंगत व्हावा आणि देशाप्रती कर्तव्यभावना जागृत व्हावी यासाठी ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मोफत दाखवला जाणार आहे. माजी सैैनिकांना यासंदर्भात आवाहन करावे असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर शाखेतर्फे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
देशभरात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने १८ ते २५ वयोगटातील युवकांमध्ये राष्ट्रकर्तव्याची भावना निर्माण व्हावी यासाठी चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण केले जाणार आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या अभियानाबद्दल महाविद्यालयांमध्ये माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांकडून करण्यात आले आहे.
चित्रपट वितरक, सिनेमागृह मालक, चित्रपट संघटनांनी या निर्णयाला अनुमती दिली आहे. पुणे जिल्ह्यातील ५६ चित्रपटगृहांमधील ४८३ स्क्रीन्सवर ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यामुळे सुमारे ४५ हजार प्रेक्षक या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकतील.