निरोगी पिकांसाठी बीजसंस्कार महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:37+5:302021-06-10T04:08:37+5:30
(रविकिरण सासवडे) बारामती: ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संतवचनामध्ये अप्रत्यक्षपणे बीजशुद्धता व बीजप्रक्रियेचे महत्त्व ...
(रविकिरण सासवडे)
बारामती: ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संतवचनामध्ये अप्रत्यक्षपणे बीजशुद्धता व बीजप्रक्रियेचे महत्त्व सांगितले गेले आहे. निरोगी पिकांसाठी बीजसंस्कार महत्त्वाचा टप्पा आहे. रोगग्रस्त बियाण्यांच्या बाहेरील पृष्ठभागावर, तसेच बियाण्यांच्या आत वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीचे जीवाणू असू शकतात. रोगट बियाणांची पेरणी झाल्यानंतर संबंधित बियाणांमध्ये असणाऱ्या सुप्तअवस्थेतील बुरशीमुळे उगवणक्षमता कमी होते व उत्पादनही कमी मिळते.
बीजप्रक्रियेमुळे जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाणांची उगवण क्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. पिकांच्या उत्पादनात वाढ होते. बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो. त्यामुळे किडरोग नियंत्रणाची ही किफायतशीर पद्धत आहे. रासायनिक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी घेणे गरजेचे आहे. बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा प्लॅस्टिक भांड्यांचा वापर करावा. या भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नये. बीजप्रक्रियेनंतर भांड्याचे झाकण किंवा प्लॅस्टिक पिशवीचे तोंड लगेच उघडू नये. बीजप्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नये. उत्तम बियाण्यांची निवड करणे यासोबतच योग्य ती बीजप्रक्रिया करणे हे भरघोस पीक घेण्याच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे बियाण्याला विविध कीड व रोगांपासून वाचविण्यासाठी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.
पेरणीपूर्व बीजसंस्कार महत्त्वाचा...
पेरणीपूर्व बीजसंस्कार करणे आवश्यक आहे. द्विदल पिकांसाठी जैविक खते, रायझोबियम, ट्रायकोडरमा, पीएसई तसेच एकदल पिकासाठी अॅझोटोबॅक्टर, पिएसई, ट्रयकोडरमा तर, उसासाठी असेटोबॅक्टरद्वारे बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशक व सर्वांत शेवटी जैविक खतांच्याद्वारे या प्रकारे करणे आवश्यक आहे. यामुळे पिकांना वातावरणातील खतांची उपलब्धता होऊन रासायनिक खतांची २० टक्के बचत, तर पीक उत्पादनामध्ये १५ टक्के वाढ होते, असे उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी सांगितले.
बियाण्यांपासून उद्भवणारे रोग
- गहू : मोकळी काणी, हील बंट, करनाल बंट, ग्लुम ब्लॉच, पानावरील करपा, मुळकुजव्या, इअर कॉकल.
- बाजरी : केवडा , साखया , पानावरील ठिपके, दाणे काणी.
- ज्वारी: मोकळी काणी, केवडा, लांब काणी, साखया, मुळकुजवा, खोडकुजव्या, बीज कूज, पानावरील ठिपके.
- मका : काणी, केवडा, रोप करपा, खोड व शेंडा कूज, पानावरील ठिपके, मर.
- तूर : राखाडी, खोडावरील करपा, काळा करपा, असकोकायटाचा पानावरील करपा, जीवाणूंचा पानावरील करपा, विषाणूजन्य रोग, मर.
- भुईमूग : मूळ व खोड कुजवा, असपरजीलचा पानावरील करपा.
- सोयाबीन : काळा करपा, मूळ कुजव्या, केवडा, जीवाणू पानावरील करपा, विषाणूजन्य रोग, शेंडा करपा.
अशी करा बीजप्रक्रिया...
बियाणे प्रक्रिया शिफारशीमध्ये दिलेल्या शिफारशीनुसार, तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार १ किलो बियाण्यास लागणाऱ्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावे. त्यापूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओले करून घ्यावे. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. मोठ्या प्रमाणावर बियाणेप्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी. जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल. यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.