खरिपासाठी जिल्ह्यात बियाणे, खते मुबलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:17+5:302021-05-22T04:10:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खरिपासाठी जिल्ह्यात बियाणे व खते यांचा मुबलक साठा आहे. दुकानांची वेळही दुपारी २ पर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खरिपासाठी जिल्ह्यात बियाणे व खते यांचा मुबलक साठा आहे. दुकानांची वेळही दुपारी २ पर्यंत वाढवल्याने शेतकऱ्यांची अडचण दूर झाली असून आता लवकरच हंगामास सुरूवात होईल.
जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र २ लाख १९ हजार ५०० हेक्टर आहे. भात, सोयाबिन, मका, बाजरी ही खरिपातील चार प्रमुख पिके घेण्यात येतात. बियाणांची मागणी यंदा २८ हजार ८६ क्विंटल इतकी आहे. त्यापैकी महाबीज १४ हजार ५०१ व व राष्ट्रीय बीज निगम १४ हजार ५०१ क्विंटल बियाणांचा पुरवठा करणार आहे. खासगी कंपन्यांकडून १३ हजार ५८५ क्विंटल बियाणे मिळतील. त्यातील महाबीज व निगमकडून ६८७१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. खासगी कंपन्यांनीही ६७१३ क्विंटल बियाणांचा पुरवठा केला आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रवी कावळे यांनी सांगितले की, खतांचा साठाही जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात आहे व नियमित होतो आहे. जिल्ह्याची खरीप हंगामातील खताची गरज २ लाख १४ हजार ८०१ टन आहे. केंद्र सरकारने १ लाख ८४ हजार ४८० टन कोटा मंजूर केला आहे. आतापर्यंत २२ हजार २०० टन खते जिल्ह्यात पोहचली आहेत. उर्वरित साठा येत आहे. मागील वर्षीची ८९ हजार ७६३ टन खते शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या १ लाख २१ हजार ९६३ टन खते शिल्लक आहेत.
बियाणे व खतांचीही यंदाच्या हंगामात कमतरता नाही. त्यातच सरकारने खतांवरचे अनुदान वाढवल्याने किमती पूर्ववत झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होईल, असा विश्वास बोटे यांनी व्यक्त केला.