एकटी महिला पाहून सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; 10 गुन्ह्यातील 5 लाखाचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 08:57 AM2023-02-01T08:57:35+5:302023-02-01T09:01:50+5:30
काही दिवसांपूर्वी धायरी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावली होते...
पुणे/किरण शिंदे : एकटी महिला पाहून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोघात चोरट्यांना सिंहगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी केलेले दहा गुन्हे आतापर्यंत उघडकीस आलेले आहेत. त्यांच्या ताब्यातून तब्बल पाच लाखाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय २०, रा. मंतरवाडी) व राजु महादेव डेंगळे (वय १९, रा. कात्रज कोंढवा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा आणखी एक साथीदार गजानन दत्तात्रय बोर्हाडे (वय ३०) हा पसार झाला आहे.
शहरात सोन साखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पादचारी महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन साखळी व मंगळसूत्र हिसकावले जात आहेत. गेल्या काही वर्षात थांबलेल्या सोन साखळी घटना वाढल्याने महिला भयभित होत्या. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढला जात होता. परंतु, या चोरट्यांचा थांगपत्ता काही पोलिसांना लागत नव्हता.
काही दिवसांपूर्वी धायरी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावली होते. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर व अमोल पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोन साखळी चोरटे सनसिटी रस्त्यावर येणार आहेत. त्यानूसार, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात पथकाने सापळा रचला. दोघे संशयित दिसताच त्यांना पकडले. चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर लागलीच ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता संबंधित गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांना या गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडीत त्यांच्याकडे सखोल तपास केला. त्यात शहरातील १० गुन्हे उघडकीस आले आहेत.