CID पाहून त्यांनी रचला खूनाचा कट; पुण्यातील ७० वर्षीय महिलेच्या खूनाचा पोलिसांनी लावला छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:52 PM2021-11-03T14:52:35+5:302021-11-03T15:30:22+5:30
(Pune Crime) दोघा अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून चोरीसाठी या खूनाचा कट रचला व त्यानुसार त्याची अंमलबजावणी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली
पुणे : घरात एकटा राहत असलेल्या ७० वर्षाच्या महिलेचा खून करुन घरातील पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात सिंहगड रोड पोलिसांनी यश आले आहे. दोघा अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून चोरीसाठी या खूनाचा कट रचला व त्यानुसार त्याची अंमलबजावणी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
हिंगणे येथे राहणाऱ्या शालिनी बबन सोनवणे (वय ७०) यांचा खून करुन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा पावणे दोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे ३० ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आले होते. या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. त्यामुळे कोणताही सबळ धागा मिळत नव्हता. अशा वेळी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी यांना घटनास्थळापासून जवळच असलेल्या रोकडोबा मंदिराजवळ लहान मुलांविषयी माहिती मिळाली. ते दुपारी पाणी पुरी खायला जाताना त्याचे दोन मित्र पाणी पुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. त्या मुलांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यावर पोलिसांनी संशयावरुन त्या १६ व १४ वर्षाच्या मुलांकडे चौकशी सुरु केली. त्यातील एका मुलाला स्वत:चे घरामध्ये चाेरीची सवय असल्याचे माहिती समोर आली. ती सांगताच मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली.
...असा रचला कट
या दोघा मुलांचे शालिनी सोनवणे यांच्या घरी जाणे येणे होते. त्या पैसे कोठे ठेवतात. हे माहिती होते. सुमारे २ महिन्यांपूर्वी त्यांनी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांच्या घराची चावी चोरली. मात्र, त्या वयस्कर असल्याने घर सोडून जात नव्हत्या. त्यामुळे त्यांना चोरी करता येत नव्हती. तेव्हा त्या एकट्या असताना चोरी करण्याचा कट रचला. ३० ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता शालिनी सोनवणे या एकट्या असताना दोघांनी घरात प्रवेश केला. दोघांबरोबर ते टीव्ही पहात असताना अचानक दोघांनी त्यांना ढकलून दिले. त्यांचे तोंड व नाक दाबून त्यांचा खून केला. कपाटातील ९३ हजार रोख व ६७ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरुन नेले. हा सर्व प्रकार करताना त्यांनी हाताचे ठसे कोठे उमटू नये, यासाठी हँडग्लोजचा वापर केला होता. त्यांच्याकडून चोरलेली रक्कम व दागिने जप्त करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेत थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, सचिन माळवे, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, सुहास मोरे, इंद्रजित जगताप, अमोल पाटील, सागर भोसले, विकास बांदल, विकास पांडोळे, अमित बोडरे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमोरे तपास करीत आहेत