वैभवशाली इतिहास होणार नजरेआड

By admin | Published: December 31, 2014 12:28 AM2014-12-31T00:28:47+5:302014-12-31T00:28:47+5:30

सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे.

Seeing a glorious history, | वैभवशाली इतिहास होणार नजरेआड

वैभवशाली इतिहास होणार नजरेआड

Next

पुणे : पुनवडी ते पुणे, पेठा कशा वसल्या, शनिवार वाड्यावर युनियन जॅक कसा फडकला, पोस्ट आॅफिस सुरू, पानिपत युद्धानंतर सैनिकांसाठी बांधण्यात आलेला लाकडी पूल, पूर्वी कात्रज तलावापासून शनिवार वाड्यापर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा कसा होत असे, अशा पद्धतीने सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे. आज (बुधवारी) हे प्रदर्शन संस्थेकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे.
बारा वर्षांपूर्वी निनाद संस्थेचे उदय जोशी यांच्याकडे पुण्याची ओळख सांगणाऱ्या या प्रदर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु हा एका तपाचा करार गेल्या वर्षी पूर्ण होऊनदेखील पालिकेने हे प्रदर्शन ताब्यात घेण्याचे किंवा कराराची मुदत वाढविण्यासंबंधीही अद्याप कोणतीच पावले उचलली नाहीत. तरीही पुण्याचे हे वैभव पर्यटकांना पाहता यावे या विचाराने जोशी यांनी पालिकेकडून काहीही अपेक्षा न बाळगता हे प्रदर्शन खुले ठेवले, ते केवळ पुणेकरांसाठी.
शहराच्या पर्यटनविषयक उपक्रमात विश्रामबाग वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूला स्थान देण्यात आलेले नाही. ही त्यातील अजून दुर्दैवी बाब आहे. या वास्तूला भेट द्यायची तर वाहन लावायचे कुठे हा मोठा प्रश्न पुणेकरांना भेडसावत असल्यामुळेच प्रदर्शनाकडेच पाठ फिरविली जात आहे. (प्रतिनिधी)

दैनंदिन खर्च सांभाळताना होतेय दमछाक
या ठिकाणी दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या फक्त १५ ते २० इतकी आहे. अनेक वर्षे तिकिट दर हे तीन रूपयेच आहेत. त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत येथील कर्मचाऱ्यांचा पगार, देखभाल खर्च सांभाळताना दमछाक होत असल्याचे नगरसेवक उदय जोशी यांनी सांगितले.

पुणे हे सांस्कृतिक शहर असून, ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. खास या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातील असंख्य पर्यटक शहराकडे आकर्षित होतात. परंतु या शहराचा इतिहास सांगणाऱ्या चांगल्या प्रदर्शनाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आज ज्या भावनेने हे पुण्याचे इतिहास सांगणारे प्रदर्शन मी व माझी पत्नी शुभदा जोशी हिने सर्वस्व लावून उभे केले, ते प्रदर्शन पालिकेकडे सोपविताना दु:ख होत असले तरी ते धूळ खात राहण्यापेक्षा पालिकेने त्याची जबाबदारी दुसऱ्या व्यवस्थापनाकडे सोपविली तर आनंदच आहे. परंतु यानिमित्ताने पुण्याची संस्कृती कशी लोप होत चालली आहे याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे.- उदय जोशी

Web Title: Seeing a glorious history,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.