मुस्लिम आरक्षणासाठी लढा तीव्र करणार, नोकरीत व शिक्षणात ५ टक्के आरक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:44 AM2018-09-10T01:44:36+5:302018-09-10T01:44:44+5:30
मुस्लिम समाजातील सामाजिक व शैक्षणिक मागसलेल्यांना नोकरीत व शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्यावे
पुणे : मुस्लिम समाजातील सामाजिक व शैक्षणिक मागसलेल्यांना नोकरीत व शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्यावे, निरपराध मुस्लिमांची हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून शिक्षा करावी, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवावे, मुस्लिम समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण बहाल करावे, संपत्तीमध्ये मुलींना वाटा द्यावा आदी मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी. अन्यथा पुणे ते मुंबई दरम्यान पायी मोर्चा काढला जाईल, असा इशारा मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीतर्फे दिला.
मुस्लिम समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात आले. तसेच गोळीबार मैदान ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आयुक्त कार्यालयासमोरील सभेत आसमा शेख, फातीमा जुमावर, हर्षा शेख, सिमरन कुरीशी, अतिफा खान, अलका अन्सारी, रूकसाना खान, सुफिया शेख, साजिया पठाण, तसमीया शेख, सालिया खान, सना शेख, सिम्मी शेख या मुलींनी मनोगत व्यक्त केले.
>आरक्षण वाढवावे
सध्या अस्तित्वात असलेले ५२ टक्के आरक्षण वाढवून ते ७० टक्के करण्यात यावे. तसेच ब्राह्मण, जैन, शिख, ख्रिश्चन, मुस्लिम, मराठा, धनगर, लिंगायत समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाला टक्केवारीनुसार शिक्षण आणि नोकºयांमध्ये आरक्षण देण्यासाठी त्वरित कायदा करून निर्णय घ्यावा. मुस्लिम समाजाला शासनाने दिलेले आरक्षण कायम करावे, आदी मागण्या मोर्चा दरम्यान करण्यात आल्या.