तेलगीच्या स्थावर मिळकती जप्त करा, पत्नी शाहिदा हिची न्यायालयाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 02:21 AM2017-12-17T02:21:12+5:302017-12-17T02:21:20+5:30

बनावट मुद्रांक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीने गैरव्यवहाराच्या पैशातून मिळविलेल्या स्थावर मिळकती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त कराव्यात, अशी मागणी तेलगी याची पत्नी शाहीदा हिनेच केली आहे.

Seeking the seizure of Telgi's property, the wife Shahida asked the court | तेलगीच्या स्थावर मिळकती जप्त करा, पत्नी शाहिदा हिची न्यायालयाकडे मागणी

तेलगीच्या स्थावर मिळकती जप्त करा, पत्नी शाहिदा हिची न्यायालयाकडे मागणी

Next

पुणे : बनावट मुद्रांक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीने गैरव्यवहाराच्या पैशातून मिळविलेल्या स्थावर मिळकती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त कराव्यात, अशी मागणी तेलगी याची पत्नी शाहीदा हिनेच केली आहे. येथील विशेष मोका न्यायालयात केलेल्या अर्जात सीबीआयने बनावट मुद्रांक गैरव्यवहाराचा फेरतपास करावा, अशी मागणी करुन ‘हे जर मी केले नाही तर मला अल्ला माफ करणार नाही’, असेही म्हटले आहे़
अ‍ॅड. मिलींद पवार, अ‍ॅड. प्रशांत जाधव यांच्यामार्फत शाहिदा हिने हा अर्ज केला आहे. तेलगीने बनावट मुद्रांक गैरव्यवहारातून कमावलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणातील स्थावर मिळकती घेतल्या. अद्यापही अनेक मिळकती सीबीआयकडून जप्त करावयाच्या राहिल्या आहेत. सीबीआयने फेरतपास व खातरजमा करून या मिळकती सरकार जमा कराव्यात, असे नमूद केले आहे.
बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटल्यात अब्दुल करीम तेलगीसह काही जणांनी आपला गुन्हा कबुल केल्यावर न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली़ ज्यांनी गुन्हा अमान्य केला त्या आरोपींवर येथील विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश एस़ एच़ ग्वालानी यांच्या समोर खटला सुरू आहे़़ सरकार पक्षाचे वतीने साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम चालू आहे. खटल्यातील मुख्य आरोपी तेलगीचे न्यायालयीन कोठडीत बंगळुरु येथे कारागृहात असताना निधन झाले. शाहीदा तेलगी ही जामीनावर असून सध्या खानापूर, बेळगाव येथील मूळ गावी वास्तव्यास आहे.

सीबीआयने आपले म्हणणे सादर करावे
शाहिदा तेलगी हिच्या वतीने अ‍ॅड़ मिलिंद पवार यांनी शनिवारी न्यायालयात एक अर्ज सादर केला़ या अर्जात तेलगीच्या मृत्यूनंतर कर्नाटक राज्यातील बेळगाव, खानापूर व इतर काही स्थावर मिळकती आहेत़ ज्या तेलगीने खरेदी केलेल्या आहेत़ ज्याच्या आयकर विभागाकडे नोंदी आहेत़ त्यावर तेलगीने आयकर भरलेला आहे. त्या कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर खरेदी केल्या आहेत, असे म्हटले आहे. विशेष मोका न्यायालयाने या अर्जावर सीबीआय व सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्यास सांगितले. पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे़

तेलगीने देशात जवळपास ६० हजार कोटींचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार केल्याने खळबळ उडाली होती. गैरव्यवहाराची व्याप्ती जवळपास १३ राज्यांत पसरली होती. अनेक बडे पोलीस अधिकारी, राजकीय नेते यांना अटक करण्यात आली. शाहीदा तेलगी हिने देखील तिचा पती व बनावट मुद्रांक गैरव्यवहार मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीला गुन्हा करणेकामी मदत केली असा तिच्यावर आरोप असून खटल्याची सुनावणी अद्याप चालूच आहे.

Web Title: Seeking the seizure of Telgi's property, the wife Shahida asked the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे