स्वीकृत सदस्यपदी शिक्कामोर्तब
By admin | Published: April 26, 2017 04:15 AM2017-04-26T04:15:28+5:302017-04-26T04:15:28+5:30
स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून झालेला राडा, उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आणि सदस्यांच्या अर्हतेवर घेतलेला
पुणे : स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून झालेला राडा, उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आणि सदस्यांच्या अर्हतेवर घेतलेला आक्षेप या सर्व गोंधळानंतर अखेर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी ५ सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपाच्या वतीने गणेश बिडकर, गोपाळ चिंतल, रघुनाथ गौडा यांची तर राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने सुभाष जगताप आणि काँगे्रसचे अजित दरेकर यांना सभागृहात येण्याची संधी मिळाली आहे.
महापालिकेच्या वतीने मंगळवारी (दि. २५) घेण्यात आलेल्या खास सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीला मान्यता देण्याचा विषय ठेवण्यात आला. हा विषय आल्यानंतर शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी स्वीकृत नगरसेवक प्रकरणी उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला; तसेच त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी दिलेला अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी केली.
याबाबत प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांनी धर्मादाय आयुक्तांकडून आलेल्या अहवालाचे वाचन करण्यास सांगितले. यामध्ये २१ एप्रिल रोजी दिलेल्या अहवालात काँगे्रसचे अजित दरेकर, भाजपाचे गणेश बिडकर आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे सुभाष जगताप संंबंधित संस्थेचे पदाधिकारी नसल्याचा अभिप्राय दिला होता; परंतु या संस्थांनी दिलेल्या चेज रिपोर्टची तपासणी न करताच हा अहवाल देण्यात आल्याने पुन्हा २४ एप्रिल रोजी दुसरा अभिप्राय घेण्यात आला. याबाबत भोसले यांनी अक्षेप घेत अहवालामध्ये अनियमितता झाली असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. भोसले यांच्या आरोपावर काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हरकत घेऊन निवडीला मंजुरी देण्याची मागणी केली.
स्पष्टीकरण देताना जगताप यांनी सांगितले, की शिवसेनेचे उमेदवार योगेश मोकाटे यांनी छाननीच्या वेळी उपस्थित राहण्याची मागणी केली. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यत्वाबद्दल खातरजमा करून घेण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्राथमिक अहवाल पाठविला; परंतु त्यामध्ये त्रुटी असल्याने पुन्हा सविस्तर अहवाल मागविणयत आला. तो अहवाल सोमवारी (दि. २४) मिळाला असून, त्यात सर्व उमेदवारांनी दिलेली संस्थांची माहिती व पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदाधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय
सभेपुढे ठेवण्यात आला व सभेने मंजुरी दिली.
पाचही स्वीकृत नगरसेवकांचा महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)