दीडशे कोटींच्या थकबाकीमुळे ‘भीमा-पाटस’वर जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:33+5:302021-08-26T04:13:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यातील भीमा-पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल ...

Seizure of 'Bhima-Patas' due to arrears of Rs | दीडशे कोटींच्या थकबाकीमुळे ‘भीमा-पाटस’वर जप्ती

दीडशे कोटींच्या थकबाकीमुळे ‘भीमा-पाटस’वर जप्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यातील भीमा-पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या कर्जाच्या परतफेडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पण गेल्या तीन वर्षांपासून साखर कारखाना बंद असून, सुरू होण्याची काहीच लक्षणे नाहीत. यामुळेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी भीमा-पाटस साखर कारखान्याला जप्तीची नोटीस दिली आहे. थकीत कर्ज परतफेड त्वरित न केल्यास कारखाना बँक ताब्यात घेईल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

दौंड तालुक्यातील भीमा-पाटस साखर कारखान्याच्या कारभाराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रमेश थोरात यांनी बुधवारी (दि. २५) ही माहिती दिली. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा तथा दौंड तालुक्यातील नेत्या वैशाली नागवडे या वेळी उपस्थित होत्या.

थोरात यांनी सांगितले की, सन २०१७-१८ पासून भीमा-पाटस साखर कारखाना बंद आहे. त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ३६ कोटी रुपयांची मदत केली. परंतु, शासनाची मदत मिळवून देखील कारखान्याचे नेतृत्व करणारे आमदार राहुल कुल कारखाना सुरू करू शकले नाहीत.

चौकट

एकाच ट्रॅक्टरवर पाच बँकांकडून कर्ज

भीम-पाटस साखर कारखान्याने सभासदांसह कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांची देखील फसवणूक केली आहे. कायदेशीर थकहमी देत एकाच ट्रॅक्टरवर तब्बल पाच-पाच बँकांकडून कर्ज घेतले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामासाठी सातशे ट्रॅक्टरवर प्रत्येकी ४० लाख रुपयांप्रमाणे १२७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. गेल्या दोन व तीन वर्षांपासून हे कर्ज देखील थकीत असल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली.

चौकट

नुसत्या गप्पा नको, कारखाना सुरू करा

दौंडचे आमदार व भीमा-पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी नुसत्या गप्पा न मारता हजारो शेतकरी व सभासदांचे हित लक्षात घेऊन साखर कारखाना सुरू करून दाखवावा. कुल यांच्या बोगस कारभारामुळे कामगार, शेतकरी, ग्राहक अडचणीत आले आहेत. याबाबत कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याची लेखी मागणी सहकार आयुक्तांकडे केली असल्याचे रमेश थोरात यांनी सांगितले.

Web Title: Seizure of 'Bhima-Patas' due to arrears of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.