आरटीई प्रवेशासाठी १४ हजार ५६७ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:32+5:302021-04-18T04:11:32+5:30
आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ प्रवेशाच्या ...
आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी ७ एप्रिलला लॉटरी (सोडत) काढली. या लॉटरी प्रक्रियेच्या कामकाजाला वेळ लागणार होता. त्यामुळे पालकांना १५ एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे एसएमएस येतील, असे शालेय शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले होते. मात्र, पुणे जिल्हा वगळता संपूर्ण राज्यातील पालकांना एसएमएस येण्यास सुरुवात झाली. परंतु, पुणे जिल्ह्यातील पालकांना शुक्रवारपर्यंत प्रवेश निश्चितीचे एसएमएस पाठविले नव्हते. शुक्रवारी उशिरा पुण्यातील पालकांना एसएमएस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली. पुण्यात आरटीई प्रवेशाच्या १४ हजार ७७३ जागा उपलब्ध असून त्यातील १४ हजार ५६७ जागांवरील प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे संचारबंदी संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी समितीकडे कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गर्दी करू नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.