पीएमपीएमएलच्या संचालकपदी प्रकाश (बंडू) ढोरे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:09 AM2021-07-20T04:09:56+5:302021-07-20T04:09:56+5:30
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचालकपदी नगरसेवक भाजपचे प्रकाश ऊर्फ बंडू ढोरे यांची निवड झाली आहे. ...
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचालकपदी नगरसेवक भाजपचे प्रकाश ऊर्फ बंडू ढोरे यांची निवड झाली आहे. सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली़
पीएमपीएमएलच्या संचालकपदी कार्यरत असलेल्या शंकर पवार यांचा राजीनामा घेतल्यावर या पदी कोणाची नियुक्ती भाजपकडून होणार याबाबत मोठी उत्सुकता होती़ महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने या पदावर भाजपचाच उमेदवार विजयी होणार हे ठाऊक असतानाही महाविकास आघाडीने ही निवणूक बिनविरोध होऊ न देता, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांची उमेदवारी जाहीर केली. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; परंतु, आंदेकर यांची उमेदवारी शेवटपर्यंत कायम राहिल्याने अखेरीस प्रशासनाने निवडीसाठी मतदान पुकारले. ऑनलाईन पार पडलेल्या या सभेत नगरसेवकांनी संंबंधित क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून मतदान केले. यात अपेक्षेनुसार सत्ताधारी भाजपचे ढोेरे हे ९६ मते मिळवून विजयी झाले. तर आंदेकर यांना ५१ मते मिळाली़
---------------
चौकट १ :- नाव समितीचे सदस्यांची नियुक्ती
या सर्वसाधारण सभेत नाव समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. सभागृहातील संख्याबळानुसार या सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात भाजपचे धनराज घोगरे, वृषाली चौधरी, ज्योत्स्ना एकबोटे, गायत्री खडके, हरीदास चरवड, ज्योती गोसावी, संदीप जराड, हर्षाली माथवड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश ढोरे, महेंद्र पठारे, कॉंग्रेसचे अजित दरेकर आणि शिवसेनेचे विशाल धनवडे यांना संधी दिली गेली़
चौकट :- २
प्रशासन अधिकारी या पदावर काम करणाऱ्या राजेंद्र रेंगडे, ज्ञानदेव सुपे, संदीप खलाटे आणि शाम तारू यांना सहआयुक्त (वर्ग -१) या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासही आजच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली़
-----------