१० जानेवारीला सासवडमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:57 IST2025-01-02T09:55:17+5:302025-01-02T09:57:49+5:30
महिला कुस्तीपटूंनी ३ जानेवारीपर्यंत संपर्क करावा

१० जानेवारीला सासवडमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा
सासवड :महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ साठी पुरंदर तालुक्यातून मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शुक्रवारी (दि. १०) सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रवींद्र जगताप यांनी दिली. दि. १८ व १९ जानेवारी रोजी कोंढवा बुद्रुक (पुणे) येथे जिल्हास्तरावरील निवड चाचणी स्पर्धा होणार असून, त्यापूर्वी तालुक्यातून निवड चाचणी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
निवड चाचणी स्पर्धेच्या नियोजनाबाबत तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सदस्यांची सासवड येथे बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पहिलवान राजेंद्र जगताप, सदस्य अशोक झेंडे, उपाध्यक्ष पै. पांडुरंग कामथे, सदस्य पै. तात्या झेंडे, पै. संतोष सोनवणे, पै. विनोद जगताप, पै. बाळासाहेब कोलते, पै. गुलाब गायकवाड, पै. रमेश जगताप, पै. चंद्रकांत गिरमे, पै. रघुनाथ जगताप, छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलाचे व्यवस्थापक पै. माउली खोपडे, पै. तानाजी जाधव उपस्थित होते.
वरिष्ठ आणि बालगटात या निवड स्पर्धा होणार आहेत. बालगटातील कुस्तीला चालना देण्यासाठी यावर्षीपासून पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत बालगटात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा समावेश होणार आहे. दि. १० जानेवारीला सकाळी ९ ते १० या वेळेत स्पर्धकांची वजने घेतली जाणार असून, माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते ११व्या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. दु. १२ पासून रात्री ९ पर्यंत या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. बालगटातील स्पर्धा गादी विभागात, तर वरिष्ठ गटातील स्पर्धा गादी आणि माती विभागात वजन गटनिहाय होणार आहेत.
स्पर्धेसाठी वजनगट पुढीलप्रमाणे -
बालगट - २५ किलो, २८ किलो, ३२ किलो, ३६ किलो, ४० किलो, ४४ किलो, ४८ किलो, ५१ किलो, ५५ किलो आणि ६० किलो. बालगटासाठी जन्मतारीख १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत असावी. वयाचा पुरावा म्हणून ओरिजनल आधार कार्ड किंवा पासपोर्ट देणे बंधनकारक आहे. सहभागी होणाऱ्या मल्लांची जिल्हा कुस्तीगीर संघाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. नसल्यास जिल्हा कुस्तीगीर संघाकडे अर्ज व रजिस्ट्रेशन फी भरून नोंदणी करता येईल.
वरिष्ठ गट- गादी व माती विभाग- ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो आणि ९७ किलो. महाराष्ट्र केसरी किताब गट ८६ ते १२५ किलो.
महिला गट :- ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७ किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो वजनगट असून, महाराष्ट्र केसरी गटासाठी ६५ ते ७६ किलो वजनगट राहणार आहे.
महिला कुस्तीपटूंनी ३ जानेवारीपर्यंत संपर्क करावा
वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी किताब २०२४-२५ साठी दि. ४ जानेवारी रोजी लोणीकंद ( ता. हवेली) येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात होणार असल्याने पुरंदर तालुक्यातून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी (दि. ३) जानेवारीपर्यंत सासवड येथील श्री शिवाजी कुस्ती संकुल येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेसाठी स्पर्धकांची जन्मतारीख २००४ व त्यापूर्वी असावी, तर २००५ किंवा २००६ मध्ये जन्मलेले स्पर्धक वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्रक घेऊन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.