पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी तीन कंपन्यांची निवड : किरण गित्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 08:01 PM2018-07-02T20:01:13+5:302018-07-02T20:04:53+5:30
पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) करण्यात येत आहे.
पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर पहिला टप्पातील पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामासाठी तीन कंपन्यांची निवड करण्यात आली. सिमेन्स, आयएफएल आणि आयआरबी या तीन कपन्यांपैैकी सर्वात कमी भाव (रेट) लावणाऱ्या कंपनीला २३.२ किलोमीटरच्या मेट्रोचे पूर्ण काम देण्यात येणार आहे, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हिंजवडी ते शिवाजीनगर पहिला टप्पातील मेट्रोच्या कामासाठी येत्या महिन्याभरात वरील तीनपैैकी एक कंपनीची निवड करून, त्यानंतर प्रत्यक्ष वर्क आॅर्डर काढण्यात येणार आहे. पुढील दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) करण्यात येत आहे. हे काम प्रामुख्याने पीएमआरडीए आणि महामेट्रो कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरची मेट्रो दुसऱ्या टप्प्यात हडपसर (शेवाळवाडी) पर्यंत नेण्यात येणार आहे. या मार्गाच्या मेट्रोसाठी स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनला करण्यात येत आहे. तसेच या मार्गासाठी नेमका किती खर्च येणार आहे याचे दरपत्रक मागवले आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर पहिला टप्पातील काम झाल्यावर ही मेट्रो पुढे शिवाजीनगर ते हडपसरपर्यंत नेल्यास रोज शहराच्या वेगवेगळ्या भागात कामानिमित्त प्रवास करणाऱ्या या परिसरातील हजारो नागरिकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या पहिल्या टप्पातील २३ कि.मी.च्या मेट्रोच्या डीपीआरची सुरूवात २०१४-१५ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर २०१६-१७ मध्ये त्याला गती मिळाली. तो वेळ वाचण्यासाठी प्रस्तावित शिवाजीनगर ते हडपसर (शेवाळवाडी) या १२ किमी.च्या मेट्रो मार्गिकेची देखील उभारणी सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्त्वावर केली जाणार आहे. त्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) संचालकांना पत्र पाठवून डीपीआरचे दरपत्रक मागविले आहे. त्यानंतर या मार्गिकेच्या कामाला गती मिळेल.
.....................
रिंगरोडबाबत आज दिल्लीत बैठक
वर्तुळकार रिंगरोडसाठी पहिल्या टप्प्यात ३३ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येत आहे. यासाठी १७ किलोमीटरची जागा ताब्यात आली आहे. तर ६ किलोमीटरची जागा टीडीआरमधून मिळणार आहे. उर्वरित १० किलोमीटरच्या जागा भूसंपादनाचे काम सुरू आहे. तसेच रिंगरोडच्या कामासाठी मोठा निधी लागणार आहे. त्याबाबत मंगळवारी दिल्ली येथे केंद्रीय सचिवालय आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) संचालकांबरोबर बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत रिंगरोडच्या कामांना अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.