‘स्वयं’विकासासाठी पळवला निधी

By admin | Published: March 2, 2016 12:56 AM2016-03-02T00:56:29+5:302016-03-02T00:56:29+5:30

निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांचे डांबरीकरण, मॉडेल वॉर्ड, भाजी मंडई यासह ठिकठिकाणी जलनिस्सारण नलिका टाकणे आणि पाणीपुरवठाविषयक कामांचा धडाका लावला आहे

'Self' collusion fund for development | ‘स्वयं’विकासासाठी पळवला निधी

‘स्वयं’विकासासाठी पळवला निधी

Next

पिंपरी : निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांचे डांबरीकरण, मॉडेल वॉर्ड, भाजी मंडई यासह ठिकठिकाणी जलनिस्सारण नलिका टाकणे आणि पाणीपुरवठाविषयक कामांचा धडाका लावला आहे. मात्र, एकाच दिवशी ऐनवेळच्या विषयांद्वारे बिनबोभाट शंभर कोटींना मंजुरी देण्यात आल्याने स्थायीच्या तत्परतेबाबत नागरिकांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. निवडणूक जवळ आल्याने आपापल्या प्रभागात कामे होण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. कामांच्या खर्चाच्या मंजुरीचे प्रस्ताव स्थायीकडे येत आहेत. मात्र, अनेक विषय वेगवेगळ्या कारणांनी तहकूब ठेवले जायचे, तर काही विषय अजेंड्यावरच येत नव्हते. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रत्येक विभागातील अनेक दिवसांपासून रखडलेले विषय आणण्यात आले. यामध्ये मोठ्या कामांसह अगदी रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, जलनिस्सारण नलिका टाकणे या छोट्या कामांचाही समावेश आहे.
त्यामुळे नगरसेवकांसह ठेकेदारांनीही समाधान झाले. निवडणुकीच्या तोंडावर विकासकामे करण्यावर भर दिला जात असला, तरी कधी नव्हे ते एकाच दिवसात सुमारे शंभर कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याने शंकाही उपस्थित होत आहे.
शहरातील विविध ठिकाणचे रस्ते दुुरुस्ती व विकसित करण्यासाठी निव्वळ सात कोटी दहा लाख रुपये खर्चास शुक्रवारी स्थायीने काही मिनिटांतच मंजुरी दिली. यामधील बरेच विषय अनेक दिवसांपासून स्थायीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, शुक्रवारी काही मिनिटांतच विषय मार्गी लागले. यासह जलनिस्सारण नलिका टाकण्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यातही स्थायीने तत्परता दाखविली. विविध ठिकाणी नलिका टाकण्यासाठी दोन कोटींचा खर्च येणार आहे.
थेरगावातील बापुजीबुवानगर येथील सर्व्हे क्रमांक ९ येथे रुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी ४८ कोटी ३० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
एरवी नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष न देणारे सदस्य स्थायी समितीत आपल्याच प्रभागाला कसा न्याय देता येईल, यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. काही जणांना पुढच्या टर्ममध्ये सदस्यत्व मिळते की नाही, या भीतीपोटी स्वत:च्याच प्रभागात निधी पळविण्यासाठी धावपळ सुरू होती.
(प्रतिनिधी)
> एकाच दिवसात शंभर कोटींची कामे मंजूर
रस्ते दुरुस्ती व विकसित करणे : ७ कोटी
जलनिस्सारण नलिका टाकणे : २ कोटी
जुनी सांगवीतील दुमजली भाजी मंडई उभारणे : ११ कोटी
सांगवी गावठाणातील प्रभाग क्रमांक ६०मध्ये
मॉडेल वॉर्ड विकसित करणे : ९ कोटी ४९ लाख
प्रभाग क्रमांक ५८ मॉडेल वॉर्डप्रमाणे
विकसित करणे : पावणेतीन कोटी
थेरगावात रुग्णालय उभारणे : ४८ कोटी ३० लाख
पंप हाऊस दुरुस्ती व देखभाल : ५ कोटी ७० लाख
अग्निशामक दलासाठी ‘क्वीक रिसपॉन्स व्हॅन : ७१ लाख

Web Title: 'Self' collusion fund for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.