गोळी झाडून सुरक्षारक्षकाची आत्महत्या
By admin | Published: April 1, 2017 12:02 AM2017-04-01T00:02:37+5:302017-04-01T00:02:37+5:30
वरिष्ठांकडील तक्रारी आणि ड्युटी करण्याच्या कारणावरून दोन बंदूकधारी सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादातून
वाघोली : वरिष्ठांकडील तक्रारी आणि ड्युटी करण्याच्या कारणावरून दोन बंदूकधारी सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादातून एकाने स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना वाघोली येथे गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
दुसऱ्या सुरक्षारक्षकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेूँ्न;. तीन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी सुरक्षारक्षकाच्याच बंदुकीतून गोळीबार करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती.
कृष्णा देविदास जाधव (वय ३२, रा. आपले घर, मूळ पिंपळगाव काजळे, परभणी) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर गजानन मगर (वय ४०, मूळ पिंपळगाव, परभणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील साईसत्यम गोदाम परिसरामध्ये असणाऱ्या एसएसकेए कंपनीचे गोदाम आहे. रात्री आणि दिवसा गोदामाच्या सुरक्षेसाठी वेक्टा सिक्युरीटीतर्फे या ठिकाणी बंदुकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री नऊनंतर बंदूकधारी सुरक्षारक्षक कृष्णा जाधव व गजानन मगर यांच्यामध्ये वरिष्ठांकडे केलेली तक्रार तसेच ड्युटी करण्याच्या कारणावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. जाधव यांनी यावेळी बंदूक स्वत:वर रोखून आत्महत्या करण्याची देखील धमकी दिली होती. गोदामातील इतर कामगार आणि सुरक्षारक्षकांनी जाधव याच्याकडील बंदूक हिसकावून घेऊन दोघांची भांडणे मिटविली. वादावादी शांत करण्यात आल्यानंतर मगर त्या ठिकाणाहून निघाले आणि जाधव यांना बंदूक पुन्हा देऊन इतर कामगार परतले. हा सर्व प्रकार गोदामातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
कामगार जात असतानाच गोदामाच्या मुख्य रस्त्यावर जाधव याने त्याच्याकडे असणाऱ्या बोअर ३२च्या बंदुकीतून स्वत:च्या डोक्यामध्ये गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोदाम परिसरात असणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांसमोर आत्महत्येचा प्रकार घडला. इतर सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांना घटनेची माहिती कळविली. लोणी कंद पोलिसांना घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही व प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविली. यानुसार जाधव यांनी स्वत:हून रागाच्या भरात आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपअधिक्षक वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनेच्या तपास केला. (वार्ताहर)