गोळी झाडून सुरक्षारक्षकाची आत्महत्या
By admin | Published: April 1, 2017 02:40 AM2017-04-01T02:40:20+5:302017-04-01T02:40:20+5:30
वरिष्ठांकडील तक्रारी आणि ड्युटी करण्याच्या कारणावरून दोन बंदूकधारी सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादातून एकाने
वाघोली : वरिष्ठांकडील तक्रारी आणि ड्युटी करण्याच्या कारणावरून दोन बंदूकधारी सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादातून एकाने स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना वाघोली येथील साईसत्यम परिसरात असणाऱ्या गोदाम परिसरामध्ये गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. दुसऱ्या सुरक्षारक्षकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तीन महिन्यांपूर्वी याच परिसरात चोरट्यांनी सुरक्षारक्षकाच्याच बंदुकीतून गोळीबार करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती.
कृष्णा देविदास जाधव (वय ३२, रा. आपले घर, मूळ पिंपळगाव काजळे, परभणी) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर गजानन मगर (वय ४०, मूळ पिंपळगाव, परभणी) या वाद घालणाऱ्या सुरक्षारक्षकास चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील साईसत्यम गोदाम परिसरामध्ये असणाऱ्या एसएसकेए कंपनीचे गोदाम आहे. रात्री आणि दिवसा गोदामाच्या सुरक्षेसाठी वेक्टा सिक्युरिटीतर्फे या ठिकाणी बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री नऊनंतर बंदूकधारी सुरक्षारक्षक कृष्णा जाधव व गजानन मगर यांच्यामध्ये वरिष्ठांकडे केलेली तक्रार तसेच ड्युटी करण्याच्या कारणावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. जाधव यांनी या वेळी बंदूक स्वत:वर रोखून आत्महत्या करण्याचीदेखील धमकी दिली होती. गोदामातील इतर कामगार आणि सुरक्षारक्षकांनी जाधव याच्याकडील बंदूक हिसकावून घेऊन दोघांची भांडणे मिटवली. वादावादी शांत करण्यात आल्यानंतर मगर त्या ठिकाणाहून निघाले आणि जाधव यांना बंदूक पुन्हा देऊन इतर कामगार परतले. भांडणाचा सर्व प्रकार गोदामातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
कामगार जात असतानाच गोदामाच्या मुख्य रस्त्यावर जाधवने त्याच्याकडे असणाऱ्या बोअर ३२च्या बंदुकीतून स्वत:च्या डोक्यामध्ये गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोदाम परिसरात असणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांसमोर आत्महत्येचा प्रकार घडला. इतर सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांना घटनेची माहिती कळविली. लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही व प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविली. यानुसार जाधव यांनी स्वत:हून रागाच्या भरात आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनेच्या तपास केला. गजानन मगरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
कृष्णा जाधवला अंतर्गत वादातून काही महिन्यांपूर्वी मारहाण झाली होती. त्या वेळी प्रकरण मिटविले गेले. मात्र या वेळी झालेल्या भांडणाचा राग अनावर झाल्याने आत्महत्येचे पाऊल उचलले गेले. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी जाधव यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. (वार्ताहर)
सुरक्षारक्षकांना प्रशिक्षणाची गरज
साईसत्यमसह वाघोली परिसरामध्ये दोनशे हून अधिक गोदामे आहेत. महत्त्वाच्या वस्तू असणाऱ्या गोदामामध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीकडून केली जाते. एजन्सीकडून सुरक्षारक्षकांचा बंदुकीचा परवाना पाहून तत्काळ कामे दिली जातात. मात्र काम करणारा सुरक्षारक्षक कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतोय, सुरक्षेची काळजी घेण्याचा समर्थपणा, मानसिक परिस्थिती, व्यसनाधीनता, अंतर्गत वाद या गोष्टींकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. कृष्णा जाधव यांनी आत्महत्या केल्यानंतर सुरक्षा एजन्सीकडून होणारा चालढकलपणाही या निमित्ताने समोर आला आहे. त्यामुळे सर्व सुरक्षारक्षकांच्या बंदूक परवान्याची चौकशी करण्याबरोबरच चोख सुरक्षेचे प्रशिक्षण देण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.