हनुमान टेकडीवर साकारणार ‘स्वयम’ फॉरेस्ट पार्क
By admin | Published: May 22, 2017 06:44 AM2017-05-22T06:44:35+5:302017-05-22T06:44:35+5:30
वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून पुणे शहरातील टेकड््यांचा त्यासाठी वापर करण्यात येणार आहे. हनुमान टेकडीवर वनविभागामार्फत ‘स्वयम फॉरेस्ट पार्क’
लक्ष्मण मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून पुणे शहरातील टेकड््यांचा त्यासाठी वापर करण्यात येणार आहे. हनुमान टेकडीवर वनविभागामार्फत ‘स्वयम फॉरेस्ट पार्क’ साकारण्यात येणार आहे. याठिकाणी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्वयम’ या लघू उपग्रहाची प्रतिकृती ठेवण्यात येणार असून, त्याभोवती बाग, अॅम्फी थिएटर आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचा वनविभागाचा मानस आहे. शहराच्या दृष्टीने भूषणावह ठरणारा हा प्रकल्प राबवण्यासाठी सीओईपीशी प्राथमिक बोलणी झाली आहेत. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर टेकड्या आहेत. वृक्षराजींनी समृद्ध असलेल्या वन क्षेत्रावर दूरदृष्टी ठेवून नियोजनबद्ध रीतीने वन पर्यटन आणि नागरी वनीकरण यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहराच्या लौकिकात भर टाकणारा स्वयम लघू उपग्रहाचा विसर पुणेकरांना पडू नये यासाठी त्याचे स्मारकाच एक प्रकारे उभारले आहे. सर्वांना त्यापासून कायम प्रेरणा मिळावी आणि वन पर्यटनाला वाव मिळावा हा उद्देश वनविभागाने डोळ्यांसमोर ठेवला आहे. वर्षभरापूर्वी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘पीएसएलव्हीसी -३४’ हा प्रक्षेपक स्वयमसह एकूण २० उपग्रह घेऊन अवकाशात झेपावला होता. सीओईपीच्या १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी गेल्या आठ वर्षांपासून हा उपग्रह तयार करण्यासाठी कष्ट घेतले होते. आठ वर्षांपूर्वी सीओईपीच्या एका विद्यार्थ्याने तत्कालीन संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या समोर मांडलेली कल्पना साकार झाली होती. हनुमान टेकडीवर स्वयमची प्रतिकृती उभारली जाणार आहे. तेथे पर्यावरण माहिती केंद्र उभारले जाईल, यासोबतच प्रेरणा केंद्रही असणार आहे. सर्वांना बसून कार्यक्रम पाहता आणि सादर करता येतील असे खुले प्रेक्षागृह (ओपन थिएटर) तयार करण्यात येणार आहे. स्वयमच्या शेजारी आणि टेकडीवरच्या खुल्या व निसर्गरम्य परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा माहोल रंगलेला पाहायला मिळेल. लोकसहभागासाठी आवश्यकता वन क्षेत्राला धक्का न लावता हा प्रकल्प राबवला जाणार आहे. टेकडीवर फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. शालेय सहली याठिकाणी येतील, वर्दळ वाढल्यावर आपोआप भुरट्या चोऱ्या, लूटमार असे प्रकार कमी होतील. वनविभागाने मांडलेली ही संकल्पना पथदर्शी आणि अभिनव आहे. स्मार्ट होत असलेल्या पुण्यामध्ये स्मार्ट वन पर्यटन निर्माण करण्यासाठी वनविभागाला लोकसहभाग आणि यंत्रणांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.