पाण्याच्या भांड्यामधून दारुविक्री!; पिंपरखेड येथून दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:17 PM2017-12-25T16:17:55+5:302017-12-25T16:20:48+5:30
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील निमंत्रण हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चक्क पाण्यांच्या जारमध्ये दारू लपून ठेवलेली आढळून आली असून पोलीस उप निरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी स्कॉर्पिओ गाडीसह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
टाकळी हाजी : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील निमंत्रण हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चक्क पाण्यांच्या जारमध्ये दारू लपून ठेवलेली आढळून आली असून पोलीस उप निरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी स्कॉर्पिओ गाडीसह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले, की आम्ही या ठिकाणी छापा मारला असता, हॉटेल समोर उभ्या असलेल्या स्कॉपिओ गाडीमध्ये पाण्याचे जार भांडे दिसले, त्यामध्ये विदेशी दारू ठेवलेली होती. ग्राहक आल्यानंतर त्यांना ती काढुन देण्यात येत होती. हा माल जप्त करीत, पोलिसांनी विशाल नामदेव दरेकर, अनिकेत बाळासाहेब पोखरकर दोघे (रा. पिंपरखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करून, ताब्यात घेतले. गाडी व विदेशी दारूसह सुमारे सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कोकरे हेही कारवाईत सहभागी झाले होते.
वाघमोडे यांच्या कारवाईने अवैध दारू धंदे वाल्याचे धाबे दणाणले असून, या प्रकारची कारवाई चालू ठेवावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे. टाकळी हाजीमध्ये तर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असून, जांबुत येथील धाब्यावर परमीट रुम सारखी दारू विक्री सुरू असते. समाजिक कार्यकते संजय पांचगे यांनी शिरूर तालुक्यात दारु बंदीसाठी मागील महिन्यात उपोषण केले होते. त्यांना वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दारू धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले. मात्र, बेट भागात अद्यापही राजरोस अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. यावर कधी कारवाई होणार, असा सवाल जनतेमधून केला जात आहे.