बारामतीत पिळदार शरीरयष्टीसाठी इंजेक्शन विकणारा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:34 PM2021-11-09T20:34:36+5:302021-11-09T20:37:46+5:30
सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केलंनंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो
बारामती : झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी रक्त पुरवठा नियंत्रित करणारी इंजेक्शन अवैध पद्धतीने जिममध्ये विकणाऱ्यास बारामती पोलिसांनी गजाआड केले आहे. बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदिप सुरेश सातव (रा. कसबा, बारामती) या आरोपीस याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. सातव हा जीम करणाऱ्या लोकांना शरीर पिळदार होते, असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे सापळा रचून सातव यास त्याची चारचाकी गाडीसह (एम.एच.०२ डी.झेड.७२८६) पकडून त्याची व गाडीची झडती घेतली असता एकूण २० इंजेक्शन बॉटल मिळून आले आहेत.
सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केलंनंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो. सदरचे औषध हे शरीरावर दुष्परिणाम करणारे असलेचे औषध निरीक्षक यांनी सांगितले आहे. सदरची औषधे ही कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसून ते बारामतीमधील जिमला विकले जात होती. पोलिसांनी तात्काळ औषध निरीक्षक यांना बोलावून सदर औषधे ही पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली आहेत.
तरुण पिढीमध्ये पिळदार शरीरयष्टी बनवण्याचे वेड वाढलेले आहे. त्यासाठी काहीही करावयाची तरुणवर्गाची तयारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे, काही इंजेक्शन घेणे यासारखे प्रकार केले जात आहेत. परंतु त्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो. शरीराची खूप मोठया प्रमाणावर हानी होत आहे. मध्यंतरी काही बॉडीबिल्डर लोकाचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचे लोन आता ग्रामीण भागातसुद्धा पसरत आहे. सदरची कारवाई ही अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, गणेश पाटील, युवराज घोडके, संजय जगदाळे पोहवा रामचंद्र अभिजित कांबळे, दशरथ कोळेकर, अजित राउत, दशरथ इंगोले, सचिन कोकणे, मनोज पवार यांनी केली आहे.
आरोपी सातव याच्याकडून कडून २६८ रुपये प्रमाणे २० बॉटल्स किंमत अंदाजे ५,३६० रुपये तसेच 9 लाख किंमतीची चारचाकी असा एकूण ९ लाख ३५,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर औषध कोठून आणली व अजून कोणाकोणाली आहे याचा पुढील तपास सहायक पोलिस निरक्षक गणेश पाटील हे करीत आहेत.