Pune: चणे फुटाणे विकणारा निघाला खूनी, तब्बल १३ वर्षे होता फरारी; राजस्थानातून अटक
By विवेक भुसे | Published: January 24, 2024 07:57 PM2024-01-24T19:57:13+5:302024-01-24T19:58:33+5:30
सेनापती बापट रोडवरील अंबिका सोसायटीतील कन्स्ट्रक्शन साईवर राजा ऊर्फ रज्जवा रामकेश यादव व बिट्टी ऊर्फ श्यामबाबु यादव हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते...
पुणे : किरकोळ वादावादीतून त्यांनी सुपरवायजर याच्या तोंडात कापडी बोळा कोंबून हातपाय बांधून जीवे ठार मारण्यात आले. १५ मार्च २०११ रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. न्यायालयाने त्याला फरार म्हणून घोषित केले होते. इतकी वर्षे झाली तरी तो सापडत नव्हता. शेवटी उत्तर प्रदेशातील गावातून पोलिस पथकाला छोटीशी माहिती मिळाली. त्याचा मोबाईल नंबर मिळाला. त्यावरुन पोलिसांनी त्याचा राजस्थानमध्ये जाऊन त्याला ताब्यात घेतले. तेथे तो चणे फुटाणे विकून नाव बदलून रहात असल्याचे आढळून आले. बिट्टी ऊर्फ श्यामबाबु छोटेलाल यादव असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
सेनापती बापट रोडवरील अंबिका सोसायटीतील कन्स्ट्रक्शन साईवर राजा ऊर्फ रज्जवा रामकेश यादव व बिट्टी ऊर्फ श्यामबाबु यादव हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. १५ मार्च २०११ रोजी रात्री ११ वाजता सुपरवायझर बाबुराव विठ्ठल मोघेकर हे तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याशी दोघांचा वाद झाला. तेव्हा त्यांनी मोघेकर यांचा खून करुन ते फरार झाले होते. श्यामबाबु यादव हा विविध राज्यात लपून रहात होता. चतु:श्रृंगी पोलिसांचे पथक अनेकदा त्याच्या उत्तर प्रदेशातील चित्रकुटमधील पहाडी गावी जाऊन शोध घेतला होता. पण, तो आतापर्यंत मिळाला नव्हता.
चतु:श्रृंगी पोलिसांचे पथक पुन्हा त्याच्या गावी गेले. तेव्हा तो वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. तांत्रिक विश्लेषणातून तो राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात रहात असल्याचे समजले. पोलीस पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा तो राधेश्याम नावाने रहात असल्याचे आढळून आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलिस उपनिरीक्षक अंगत नेमाणे, पोलिस हवालदार सचिन कांबळे, सुहास पोतदार, सुधाकर माने, अस्लम अत्तार, गोकुळ घुले या पथकाने ही कामगिरी केली.