वाळूमध्ये मुरुमाची भेसळ करून विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:55 PM2019-01-08T23:55:56+5:302019-01-08T23:56:16+5:30
बेकायदा धंदा तेजीत : पर्यावरणास धोका तस्करांची नजर नदी, ओढे, गायरानावर
टाकळी हाजी : वाळूचा साठा कमी झाल्यामुळे, वाळूचे भाव गगनाला भिडले असून, उपलब्ध वाळूमध्ये मुरूम एकत्र करून विकण्यांचा धंदा शिरूर तालुक्यातील वाळूतस्कर मोठ्या प्रमाणात करू लागल्याने, नदी, ओढे पाठोपाठ सरकारी, गायरान जमिनीवर तस्करांची नजर गेली असून, पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
म्हसे (ता. शिरूर) येथे सरकारी गायरान जमिनीमध्ये दोन दिवसांपूर्वी सुमारे ५७५ ब्रास मुरुम वाळू तस्करांनी चोरला असल्याची मोठी कारवाई तहसीलदार रणजित भोसले यांनी केली असल्यामुळे मुरूम चोरणाऱ्यांमध्ये खळबळ झाली आहे. हा पंचनामा जरी ५७५ ब्रासचा केला असला तरी प्रत्यक्षात ते एक ते दीड हजारपेक्षा जास्त मुरुम येथून उपसा झाल्याचा अंदाज ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. पुण्यामधे वाळू साडेसात हजार रुपये ब्रासने विकली जाते. अनेक वर्षे वाळूचे लिलाव झाले नाहीत, त्यामुळे वाळूतस्करांनी वाळूमध्ये मुरुम एकत्र करून, विकण्याचा जोरदार धडाका लावला आहे. मुरुमाला वाळूची किमंत मिळू लागल्याने ग्रामीण भागात मुरूमचोरांचे प्रमाण वाढले आहे. गावाच्या जवळपास सरकारी गायरान जमिनी, वन विभागाच्या जमिनीवर तस्करांचा मोर्चा वळला असून, गावठाणेसुद्धा मुरुम उपशाने खड्डेमय झाले आहे. स्थानिक पातळीवर दोन हजार रुपये ब्रासने मुरुम विकला जातो. हा मुरुम चाळून वाळूत टाकला जातो, त्यातून रात्रीत प्रतिब्रास साडेसात हजारांची कमाई होते.
नद्या, ओढे यांची दिवस-रात्र वाळू चोरून नद्यांचे वाळवंट झाले, असताना आता सरकारी जमिनीमधून जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने मुरुमचोरी सुरू असल्याने, महसूल विभागाने कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करतात.
तालुक्यातील काही सरकारी जमिनी ग्रामपंचायतीकडे असूनदेखील मरूमचोरीबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्तकरीत आहे.
पोलीस पाटील कागदावरच...
प्रत्येक गावात पोलीसपाटील असून, त्यांना शासनाचा पगार दिला जातो, मात्र ते वाळू, मुरुम, उत्खननाबाबत कोणतीही माहिती महसूलला देत नाहीत, काही पाटील गावाबाहेर शहरात राहतात, त्यांच्यावर महसूल प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.