घातक शीतपेयांची विक्री, सर्व नियम कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:57 AM2018-02-23T00:57:16+5:302018-02-23T00:57:22+5:30
उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली, तरी उघड्यावर शीतपेये आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाºया विक्रेत्यांच्या शीतपेयांची, खाद्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याला अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वेळच नसल्याचे दिसत आहे.
मोशी : उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली, तरी उघड्यावर शीतपेये आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाºया विक्रेत्यांच्या शीतपेयांची, खाद्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याला अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वेळच नसल्याचे दिसत आहे. कारण उन्हाळा सुरू होणार असून, त्यांच्याकडून अद्यापही तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली नाही. शीतपेय विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थ आणि पेयांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात यावी आणि दोषी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोशी आणि चिखलीतील ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
उन्हाळ्याला सुरुवात होताच शहराच्या सर्वच भागांत आणि प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शीतपेय विक्रीची अनेक दुकाने थाटली आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणाºयांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये दिलासादायक वाटतात. त्यामुळेच या शीतपेयांना मागणी वाढते.
थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, मठ्ठा, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, फळे, फळांच्या फोडी, सॅलड, भेळपुरी, पाणीपुरी, शेंगदाणे, चाट विक्रेते, फास्ट फूडविक्रेते यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. फिरत्या शीतपेये आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची कुठलीच मोहीम सुरू न केल्याने मोशीकरांच्या आरोग्याशीच हा खेळ होत असल्यामुळे मोशी आणि चिखलीकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आमच्या उत्पादनाचा दर्जा उत्तमच
आम्ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळत नाही. अनेक वर्षांपासून आम्ही हाच व्यवसाय करत असून परवाना नसला, तरी आमच्या उत्पादनाचा दर्जा उत्तमच असतो, अशी माहिती मोशी येथील शीतपेय विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
एफडीएकडे नोंदणी बंधनकारक
मात्र, या विक्रेत्यांकडची शीतपेये आरोग्यास हितकारक आहेत की नाही, याची शहानिशा करण्याची आणि अशा विक्रेत्यांना परवाना देण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनावर (एफडीए) आहे. अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार तर अन्नपदार्थ आणि शीतपेयांची विक्री करणाºया सर्वच फिरत्या विक्रेत्यांना एफडीएकडे नोंदणी बंधनकारक आहे. या परवानगीशिवायच अनेक विक्रेते मोशी, चिखलीमध्ये सर्रास शीतपेय विक्री करीत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध रंगांचा वापर करून शीतपेयांची विक्री करतात. प्रत्यक्षात नैसर्गिक रंगांचे किंवा आयएसआय मार्क असलेले रंगच वापरणे आवश्यक आहे. कुठल्याही रसायनांचा शीतपेयांमध्ये वापर केला जाऊ नये.
सर्व नियम कागदावरच!
चव किंवा रंगांचे पदार्थ प्रमाणातच वापरावेत, छापील किमतीपेक्षा जास्त दराने शीतपेयांची विक्री करणे गुन्हा असतानाही अशी वाढीव दराने विक्री सुरूच आहे. हे सर्व नियम कागदावरच राहिले आहेत. फळांचा रस विक्री करणारे विक्रेतेही वाढले असून, त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाची फळे वापरली जात आहेत. उन्हाळ्यात विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे माहीत असूनही संबंधित प्रशासनाकडून कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आलेली नाही.