झटपट पैसे कमवण्यासाठी अफूची विक्री; राजस्थानातील एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:43 IST2025-01-23T09:43:50+5:302025-01-23T09:43:59+5:30
आरोपीकडून २१ लाख ८० हजार रुपयांची एक किलो ९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली

झटपट पैसे कमवण्यासाठी अफूची विक्री; राजस्थानातील एकाला अटक
पुणे : राजस्थानातून अफू विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने काेंढवा भागात पकडले. त्याच्याकडून २१ लाख ८० हजार रुपयांची एक किलो ९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.
नाथूराम जीवनराम जाट (५२, रा. असावरी, जि. नागोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाट याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा भागातील अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी गस्त घालत होते. त्या वेळी जाट तेथून निघाला होता. त्याच्याकडे पिशवी होती. पोलिसांच्या पथकाने संशयावरून त्याची चौकशी केली. पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत अफू सापडली.
पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, दयानंद तेलंगे पाटील, संदीप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर यांनी ही कारवाई केली.
आरोपी नाथूराम जाट मूळचा राजस्थानातील आहे. तो पूर्वी फर्निचरचे काम करायचा. झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने राजस्थानातून अफू विक्रीस आणली होती. त्याने आतापर्यंत कोणाला अफू विक्री केली, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.