Pune: अकराशे कोटींचा सेमी कंडक्टर उद्योग पुणे परिसरात येणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:30 AM2024-02-29T10:30:26+5:302024-02-29T10:30:59+5:30
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची माहिती...
पुणे : इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सेमी कंडक्टर उपकरणांसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन धोरणामुळे केवळ दोन वर्षांत तब्बल अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली. त्यातील अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे परिसरात होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. यासंदर्भात मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकसित भारत संकल्पनेबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाकाळात सेमी कंडक्टर उपकरणांमुळे वाहन उद्योगाला मोठा फटका बसला होता. ही उपकरणे मुख्यत्वे चीनमधून आयात केली जात असल्याने या उपकरणांसाठी भारत चीनवर अवलंबून होता. कोरोनानंतरच्या काळात केंद्र सरकारने यासंदर्भात नवीन धोरण आणल्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरातील मोठ्या सेमी कंडक्टर उद्योजकांनी देशात अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असल्याचे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही काळात भारत हा सेमी कंडक्टर देश म्हणून ओळखला जाईल, असेही ते म्हणाले.
सेमी कंडक्टरचे उत्पादन करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमधून मागणी असली तरी पुणे व परिसरातून यासाठी विशेष रस दाखविण्यात येत आहे. पुणे व राज्यात सेमी कंडक्टर उद्योगांसाठी तब्बल अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, यासंदर्भातील मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
चंद्रशेखर यांनी यावेळी केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. देशात १३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधा क्षेत्रात केली जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. देशभरात सध्या एक लाख वीस हजार स्टार्टअप सुरू असून, त्या माध्यमातून नवनवीन संशोधन होत असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या प्रगतीमुळे पुढील दशक भारताचे असणार आहे आणि विकसित भारताची ही मोहीम पुढे नेण्यासाठी युवकांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.