पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीला हव्यात ६-६ जागा; विधानसभेआधी 'मविआ'त कुरघोडीचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:53 AM2024-06-17T10:53:07+5:302024-06-17T10:54:01+5:30
सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. मात्र पुण्यातील जागावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे.....
- किरण शिंदे
पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेळ आली आहे विधानसभा निवडणुकीची. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभेत चांगले यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. मात्र पुण्यातील जागावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यातील आठ जागांपैकी सहा जागांवर दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पुण्यातील तब्बल सहा जागांवर आपला दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुण्यातील शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सहा मतदारसंघावर दावा केला. इतकच नाही तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीने सहा जागांवर दावा करताच शिवसेना देखील मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी देखील पुण्यातील सहा जागांवर दावा केला आहे. पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे. यापूर्वी शहरात शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. सध्या शहरात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली असून ताकदही वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पुण्यात सहा जागा मिळाव्यात असे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच महाविकास आघाडीतील घटक पक्षात जागावाटपावरून कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे.