Kothrud Vidhan Sabha: 'कोथरूडमधील कोल्हापूरचं पार्सल परत पाठवा', राऊतांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 01:39 PM2024-11-15T13:39:32+5:302024-11-15T13:42:54+5:30
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याने मतांच्या विभागणीचा फटका कोणाला बसणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुणे : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ पासून प्रचंड मताधिक्याने भाजप कोथरुडमध्ये निवडून येत आहे. मागील निवडणुकांच्या मतांचे गणित पाहता भाजपची मतं आतापर्यंत सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याने मतांच्या विभागणीचा फटका कोणाला बसणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुतीकडून चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रकांत मोकाटे आणि मनसेकडून किशोर नाना शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अशातच आज कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारार्थ संजय राऊत आले होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. भूमिपुत्राला निवडून आणायचं की कोल्हापूरचं पार्सल परत पाठवण्याचं हे कोथरुडकरांच्या हाती आहे असेही ते म्हणाले.
चंद्रकांत मोकाटे हे भूमिपुत्र आहे. भूमिपुत्राला निवडून आणायचं की कोल्हापूरचं पार्सल परत पाठवण्याचं हे कोथरुडकरांच्या हाती आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. ते पुढे म्हणाले,'राज्यात खूप प्रश्न आहेत. पुण्यात कोयता गँगचे म्होरके निवडणुकीला उभे असल्याचेही राऊत म्हणाले. 23 तारखेला आमदार म्हणून मुंबईत या असेही राऊत मोकाटे यांना म्हणाले. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल.'
ते पुढे म्हणाले,'१७ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे येतात शेवटच्या दिवशी सभा होते. तेव्हा कोयता गँग आहेच त्यांचेच उमेदवार उभे राहिले आहेत असे वाटते. खून मारामाऱ्या उन्माद सुरू आहे. याची काही जबाबदारी पालकमंत्र्यांवर आहे की नाही? आता जनता जागृत झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. पुन्हा आपल्या हातात सत्ता येईल आणि महाविकास आघाडी'चा मुख्यमंत्री होईल. ' असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. यापूर्वी हा मतदारसंघ शिवाजीनगरचा भाग होता. भाजपने कसब्याप्रमाणेच या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले असले तरी येथे पहिली मोहोर शिवसेनेने उमटविली. पुनर्रचनेनंतर पहिल्याच निवडणुकीत चंद्रकांत मोकाटे निवडून आले. त्याही आधी शशिकांत सुतार यांनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला केलाच होता, पण नंतरच्या काळात कसबा, सदाशिवपेठ, नारायणपेठ इथले रहिवासी वाढू लागले आणि राजकीय वारेही बदलले.
कोथरूड मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांनी ५२ हजार ०५५ मते घेऊन मनसे उमेदवार ॲड. किशोर शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना ४४ हजार ८४३ मते मिळाली होती. मोकाटे यांनी ७ हजार २१२ मतांची आघाडी घेतली होती. सन २०१४ लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आपली आघाडी मोडत निवडणूक वेगवेगळी लढवण्याचे ठरवले. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची २५ वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली. यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली होती. कोथरूडमधून भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी १ लाख ९४१ मते घेऊन शिवसेनेच्या मोकाटे यांचा पराभव केला. मोकाटे यांना ३६ हजार २७९ मते पडली. कुळकर्णी ६४ हजार ६६२ मतांची लीड घेऊन विजयी झाल्या. कोथरूडमधील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे मताधिक्य आहे.
सन २०१९ मध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले. त्यांना १ लाख ५ हजार २४६ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना ७९ हजार ७५१ मिळाली. त्यांचा २५ हजार ४९५ मतांनी पराभव झाला. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना ५३.९३ टक्के मते मिळाली, तर शिंदे यांना ४०.८७ टक्के मते मिळाली.