ईव्हीएम तपासणीसाठी सीएफएसएलकडे पाठवा
By admin | Published: May 8, 2017 03:10 AM2017-05-08T03:10:09+5:302017-05-08T03:10:09+5:30
पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) तपासणीसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) तपासणीसाठी हैदराबाद येथील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (सीएफएसएल) १५ मेपूर्वी पाठवावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले असून यानंतर तपासणीचा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याबाबत काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर हा आदेश देण्यात आला आहे. छाजेड यांनी भाजपाच्या उमेदवार माधुरी मिसाळ, पर्वती विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक आयोग यांना प्रतिवादी केले आहे. शुक्रवारी न्यायालयाने या निवडणूक याचिकेवर हा निर्णय दिला.
छाजेड यांना मतदान करणाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी प्रतिज्ञापत्र दिले होते. अशा मतदारांनी १८५ आणि २४२ या क्रमांकाच्या २ बूथमध्ये केलेल्या मतदानापेक्षा छाजेड यांना कमी मतदान मिळाले आहे. अशा ६३ मतदारांची तपासणी न्यायालयाने केली. त्या वेळी ५२ मते छाजेड यांना मिळत असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात यंत्रामध्ये मतदान कमी दिसत असल्याचा छाजेड यांचा संशय आहे. छाजेड यांच्या वतीने त्यांचे वकील विश्वजित सावंत काम पाहत आहेत.
छाजेड यांनी सांगितले, की देशात प्रथमच निवडणूक याचिकेवर अशा प्रकारचा निर्णय प्रथमच होत आहे. ‘सीएफएसएल’ला कोणतीही तांत्रिक माहिती हवी असल्यास ती देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.