मानवंदना अन् साश्रूनयनांनी प्रसाद बेंद्रे यांना निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 01:47 AM2018-11-12T01:47:13+5:302018-11-12T01:47:51+5:30
सीमा सुरक्षा दलाचे होते अधिकारी : कर्तव्य बजावत असताना झाले निधन
पुणे : अवघ्या २७ व्या वर्षी प्रसाद बेंद्रे यांचे सीमेवर देशाचे रक्षण करीत असताना त्यांचे निधन झाले. त्यांना मानवंदना देत असताना आणि आईच्या हाती तिरंगा सोपविताना उपस्थितांचे डोळेही पाणावले. शिवाजीनगर गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांच्यावर रविवारी भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले होते़ त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले़
शिवाजीनगर गावठाण येथील राहत्या घरापासून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली़ शिवाजीनगर गावठाणाबरोबर शहरातील विविध भागातील नागरिक अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ वैकुंठ स्मशानभूमीत अंत्ययात्रा आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी बेंद्रे यांच्या पार्थिवावरील तिरंगा काढून त्यांच्या आईच्या हातात दिला़ यावेळी त्यांना व बेंद्रे यांच्या बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला़ तेव्हा उपस्थितांनाही गहिवरून आले़ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत तीन वेळा गोळीबार करून त्यांना मानवंदना दिली़ यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते़
बेंद्रे कुटुंबीय शिवाजीनगर गावठाणात पंचमुखी मारुती परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी प्रसाद यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाइकांना समजली. त्यानंतर परिसरातील नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली.
उपस्थितांच्याही कडा ओलावल्या...
४प्रसाद बेंद्रे यांच्या मागे पत्नी, आई व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे़ चार वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते़ प्रसाद यांचा दौंड येथील सायली डहाळे यांच्याशी जुलै २०१६ मध्ये विवाह झाला होता़ तसेच सायली या गरोदर आहेत. त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावलेल्या दिसून येत होत्या.
१ पोलीस वसाहतीतील हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले़ त्यानंतर मॉडर्न हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण झाले़ बारावीनंतर ते बीएसएफच्या १८२ व्या तुकडीत दाखल झाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. नुकतीच त्यांची मणिपूर, इम्फाळ येथील चीन सीमेवर बदली झाली.
२ गणपतीत ते पुण्यात आले होते़ हीच त्यांची अखेरची भेट ठरली़ गणपतीनंतर त्यांची मणिपूरला बदली झाली़ सुमारे ५ दिवसांपूर्वी त्यांना न्युमोनिया झाला होता़ भाऊबिजेनिमित्त त्यांच्याशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे शुक्रवारी बोलणे झाले होते़
३ त्यांना श्वसनाचा थोडा त्रास जाणवत होता. हॉस्पिटलमधून लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते़ त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचे एका पाठोपाठ दोन झटके आले़ त्यातच त्यांचे निधन झाले.