पहिल्या पतीच्या मुलास पैसे पाठवते; दुसऱ्या पतीनं डोक्यात दगड घालून केला पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:42 PM2022-03-14T16:42:51+5:302022-03-14T16:43:04+5:30
नर्सरीमध्ये मिळणा-या कामाचे पैसे तिचे पहिल्या पतीच्या मुलास पाठवित असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असे
लोणी काळभोर : नर्सरीमध्ये मिळणा-या कामाचे पैसे तिचे पहिल्या पतीच्या मुलास पाठवित असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दुसऱ्या पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घुनपणे खुन केला असल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे घडली आहे.
गोमती भोपाली केवट, वय-४९, (रा. संदिप रोझ नर्सरी, सोरतापवाडी, हवेली,) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. नर्सरीमालक अमर काळुराम पांगारकर (वय ४७, रा. महादेव नगर, सोरतापवाडी, ता. हवेली.) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तिचा पती मुरली चैनु केवट (वय ३६, मुळगाव- राजनगर नोहरा, आचरोणी, नोहरा, खानियाधना, शिवपुरी, मध्यप्रदेश.) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगारकर यांनी दत्तात्रय दाभाडे यांचे जागेत भाडेतत्वावर संदिप रोझ नर्सरी नावाने नर्सरी व्यवसाय सुरू केला आहे. तेथे इतर कामगारांसमवेत केवट पती पत्नी काम करतात. गोमतीला तिच्या पहिल्या पतीपासून निरज नावाचा एक मुलगा आहे. तो मध्यप्रदेश येथे राहण्यास असून तो कधीमधी नर्सरीवर येत असतो. तसेच गोमती ही नर्सरीचे कामातून मिळणारे पैसे मुलास पाठवित असे. त्यामुळे गोमती व मुरली या दोघांमध्ये कामाच्या पैश्यावरून भांडण होत असे. तसेच गोमती तिचे मुलास पाठवित असणारे पैश्यामुळे दोघांत वारंवार भांडणे व वादविवाद होत असत. भांडणे झाल्यानंतर पांगारकर कधी कधी जावुन भांडणे मिटवुन त्यांना शांत राहण्यास सांगत होते.
रविवार (१३ मार्च) रोजी ते घरी असताना रात्री १०-३० वाजण्याच्या सुमारांस नर्सरीवर काम करणारे सुरेश यांनी त्यांना गोमती व मुरली यांचेमध्ये भांडणे झाली असल्याचे पांगारकर यांना सांगितले. ते तात्काळ नर्सरीवर गेले असता त्यांना घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत गोमती बेशुध्द अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी सांगितले की, गोमती व मुरली यांच्यामध्ये जोरजोरात भांडणे सुरु होती. तेव्हा मुरली यांनी गोमतीच्या डोक्यात दगड घालून तिला जखमी केले. व त्यानंतर मुरली कोठेतरी निघुन गेला आहे. पांगारकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले नंतर रुग्णवाहिकेतून गोमती हिस ससुन रूग्णालय पुणे येथे पाठवले. तेथील डॉक्टरांनी गोमतीची तपासणी करुन मृत झाल्याचे घोषित केले.