ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सुहास परचुरे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 10:51 PM2022-11-15T22:51:06+5:302022-11-15T22:51:42+5:30
डॉ. परचुरे यांनी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ची स्थापना केली होती.
पुणे : संपूर्ण हयात आयुर्वेदाच्या उत्कर्षा साठी खर्च करणारे सेवाव्रती, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य, ज्येष्ठ वैद्य डॉ. सुहास परचुरे यांचे मंगळवारी (दि.15) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. पुण्यात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने आयुर्वेदाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
डॉ. परचुरे यांनी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ची स्थापना केली होती. निमा तसेचआयुर्वेद रासशाळाच्या राष्ट्रिय शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष होते. ताराचंद धर्मार्थ आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटचे माजी व्यवस्थापकीय संचालक, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आयुर्वेद विभागाचे डीन, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य यासह अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत, अशी माहिती ताराचंद हॉस्पिटल चे सचिव डॉ. राजेंद्र हुपरिकर यांनी दिली.
केंद्रीय आयुर्वेद परिषदेत असतांना त्यांनी महाराष्ट्रात आयुर्वेदाच्या नवीन महाविद्यालयांना कोणतीही अपेक्षा न ठेवता परवानगी दिली. त्यामुळे राज्यात आयुर्वेदाचे महाविद्यालये उभी राहू शकली. ते केवळ आयुर्वेद नव्हे तर सर्वसमावेशक पॅथीचे (इंटेग्रेटेड मेडिसिन) चे खंदे पुरस्कर्ते होते. आयुष डॉक्टरांची अडचणींवर त्यांनी नेहमीच शासनासोबत आयुष च्या बाजूने भांडण केले व त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली.
अखेरच्या श्वासापर्यंत ते लिखाण, कार्यक्रम याद्वारे सक्रिय होते. कोरोनाच्या काळात त्यांनी आयुर्वेदिक औषधे ही प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त असल्याचे ठासून सांगितले. अनेकांना त्यांनी निरपेक्ष भावनेने मदत केली. तसेच आयुर्वेदात नामांकित डॉक्टरही घडवले अशी माहिती आयुष डॉ. संगीता वाघमोडे, डॉ. विक्रांत पाटील यांनी दिली.