ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ दादा खडीवाले यांचे पुण्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:42 PM2017-12-28T16:42:16+5:302017-12-28T16:43:57+5:30
ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ आणि सामाजिक कार्याला मुक्तहस्ताने मदत करणारे परशुराम यशवंत खडीवाले उर्फ दादा वैद्य खडीवाले यांचे वृद्धापकाळाने खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
पुणे : ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ आणि सामाजिक कार्याला मुक्तहस्ताने मदत करणारे परशुराम यशवंत खडीवाले उर्फ वैद्य दादा खडीवाले यांचे वृद्धापकाळाने खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
परशुराम यशवंत खडीवाले यांचा जन्म २४ आॅक्टोबर १९३२ रोजी झाला. खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल १९६८ साली निवृत्त झाले. त्यांच्या वडिलांनी मृत्यूपत्रात ‘परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे. औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे’, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे निवृत्तीनंतर प. य. खडीवाले यांनी पुण्यातील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवीचे शिक्षण संपादन केले. अभ्यासक्रम सुरु असतानाच त्यांनी हरी परशुराम औषधालय सुरू केले. १९७४ मध्ये वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून सर्वसामान्यांना आयुर्वेदाचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने गुरुकूल सुरु केले. ४० वर्षे त्यांनी हे गुरुकूल विनाशुल्क चालवले. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात त्यांनी कोणतेही मानधन न घेता १० वर्षे रसशास्त्र विषयाचे अध्यापन केले.
दादा खडीवाले यांनी ॠषीतूल्य महर्षी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या नावाने १९७० साली पंचकर्म रुग्णालयाची स्थापना केली. वैद्यकीय संदर्भ ग्रंथालयासाठी त्यांनी वैद्य अप्पासाहेब शास्छी साठे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ग्रंथालय सुरु केले. वैद्य खडीवाले यांनी ३० वर्षे पुणे महानगरपालिकेच्या गाडीखाना येथील कोटणीस रुग्णालयामध्ये एडसग्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि उपचार सुरु केले. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २ एकर जागेत औषधी वनस्पतींचे उद्यानही उभारले आहे. खडीवाले यांना पुणे महानगरपालिका, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिक आरोग्य विद्यापीठ, पंढरपूर देवस्थान यांच्यातर्फे विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी आयुर्वेदावर आधारित पुस्तकेही लिहिली आहेत.