भाजपाचे ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:38 PM2022-12-08T15:38:46+5:302022-12-08T15:40:19+5:30
दिगंबर भेगडे यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला...
तळेगाव दाभाडे (पुणे) :मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, अध्यात्मिक व कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व, माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे यांचे गुरुवारी (दि.८) दुपारी दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी भागुबाई, दोन भाऊ, मुलगा मनोहर आणि प्रशांत, तीन मुली, पुतण्या तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
इंदोरी गावचे उपसरपंच म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य, मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, दोन वेळा मावळ तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.
दिगंबर भेगडे यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता कुंडमळा, शेलारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिगंबर भेगडे हे मावळातून भाजपच्या तिकिटावर १९९९ व २००४च्या सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. भेगडे यांना आज सकाळी दहाच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.