पोलीस असल्याची बतावणी करून पुण्यात ज्येष्ठाला साडेबारा हजाराचा गंडा, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 06:28 PM2017-12-08T18:28:52+5:302017-12-08T18:32:50+5:30
पोलीस असल्याची बतावणी करून सीसीटीव्ही फुटेज रद्द करण्यासाठी पैशाची मागणी करीत चार जणांनी ज्येष्ठ नागरिकाला साडेबारा हजार रूपयांना गंडा घातला.
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून सीसीटीव्ही फुटेज रद्द करण्यासाठी पैशाची मागणी करीत चार जणांनी ज्येष्ठ नागरिकाला साडेबारा हजार रूपयांना गंडा घातला. बुधवार पेठेतील विजयमारूती चौक व सिटी पोस्ट आॅफिस एटीएम सेंटर येथे २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा प्रकार घडला. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असून, इतर तिघांविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचवड येथे राहणाऱ्या एका ६२ वर्षीय नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार अंकुश परशुराम भिसे (वय ३५, रा. विंझर, ता.वेल्हा) यास अटक करण्यात आली आहे. तर मेहबुब समीर शेख, अंकुश लोंढे उर्फ कांबळे आणि लंबु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी पोस्ट आॅफिस एटीएम सेंटर याठिकाणी हे चार आरोपी फिर्यादी यांच्या जवळ आले. आम्ही सिव्हील पोलीस असून, तुमचे सीसीटीव्ही फुटेज आले आहे. ते फुटेज कॅ न्सल करायचे असेल आणि सगळे प्रकरण इथेच मिटवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावी लागतील म्हणून त्यांनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली आणि फिर्यादी कडून एकूण १२ हजार ५०० रूपयांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एन. शिंदे पुढील तपास करीत आहेत.