Pune Crime: परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने कोथरुडमधील ज्येष्ठाला १६ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 11:32 AM2023-07-06T11:32:21+5:302023-07-06T11:32:58+5:30
वृद्धाच्या वेगवेगळ्या टेलिफोन मुलाखती घेऊन त्यांची नियुक्तीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी खोट्या बहाण्याने पैसे उकळले...
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या वृद्धांची परदेशात नोकरी करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृद्धाच्या वेगवेगळ्या टेलिफोन मुलाखती घेऊन त्यांची नियुक्तीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी खोट्या बहाण्याने पैसे उकळले.
कोथरूड परिसरात राहणाऱ्या ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादींना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन येऊन परदेशात काम करण्याची इच्छा आहे का असे विचारले. परदेशात नोकरी करण्यास होकार दिल्याने तक्रारदाराकडून ६ हजार ४९९ रुपये प्रोसेसिंग चार्जेस म्हणून घेण्यात आले. काही कालावधीनंतर भारताबाहेरील कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या दोन मुलाखतींची पुष्टी करणारा ई-मेल तक्रारदाराला प्राप्त झाला. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन व्यक्तींनी तक्रारदाराच्या दूरध्वनी मुलाखती घेतल्या आणि त्यांची निवड झाल्याची पुष्टी केली.
त्यांनतर प्रशिक्षण सुरक्षा व्यवस्था, कायमस्वरूपी रोजगार करार, कागदपत्रे गोळा करणे, वैद्यकीय चाचणीसाठी नियुक्ती, प्रकल्प व्यवस्थापन व्यावसायिक शुल्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तब्बल १६ लाख ३६ हजार रुपये उकळले. त्यानंतर तक्रारदाराला संशय आल्याने तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि जबाब नोंदविला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.