Pune | लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखवून पुण्यातील आजोबाला लाखो रुपयांना लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:18 AM2023-03-31T10:18:01+5:302023-03-31T10:20:11+5:30
याप्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
पुणे : व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग करून लैंगिक भावना उत्तेजित करून नग्न होण्यास भाग पाडून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठ नागरिकाला सेक्स टॉर्शनमधून ४ लाख ६६ हजार रुपयांना लुबाडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ ते २५ मार्च दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ते घरी असताना त्यांना व्हॉट्सअॅपवर कॉल आला. त्यांच्याशी एका तरुणीने चॅटिंग व व्हिडीओ कॉल करून त्यांच्या लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखविला. त्यांना नग्न होण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा हा व्हिडीओ कॉल स्क्रीन रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांना हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्या पैसे मागण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे त्यांनी घाबरून ती सांगेल तसे पैसे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सायबर सेल दिल्ली क्राईम ब्रँचमधून राम पांड्ये बोलत असल्याचे सांगून तुमचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड होणार असून, पायल शर्मा हिने तक्रार दिल्याचे सांगितले.
त्यानंतर यूट्यूब प्रतिनिधीशी बोला, असे सांगून संजय सिंग नाव सांगणाऱ्याचा नंबर दिला. त्याने व्हिडीओ डिलिट करण्यासाठी दीड लाखाची मागणी केली. त्यांनी पैसे दिल्यावर आता तुमची केस मुंबई सायबर सेलला पाठविणार असल्याची भीती दाखवून त्यांच्याकडे ५ लाखांची मागणी केली. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक चिंतामण तपास करीत आहेत.
राजस्थानातील टोळ्या
अशा प्रकारे सेक्स टॉर्शन प्रकरणात पुण्यातील दोघा तरुणांनी आत्महत्या केली होती. पुणे पोलिसांनी राजस्थानमधील दोन टोळ्यांना अटक केली होती. राजस्थानमधील गुरुगोठिया गाव परिसरातील टोळ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले होते. या टोळ्यांनी देशभरात गुन्हे करून नागरिकांकडून खंडणी उकळली होती. गेल्या वर्षभरापासून शहरात सेक्स टाॅर्शन प्रकार वाढीस लागले आहेत.