पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गापासून ज्येष्ठ नागरिक दूर; साडेपाच लाखांवर सर्वेक्षणात फक्त ४० पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 05:05 PM2020-08-28T17:05:41+5:302020-08-28T17:15:39+5:30
जिल्ह्यात जवळपास ५ लाख ९६ हजार ५२२ ज्येष्ठांचे सर्वेक्षण
निनाद देशमुख
पुणे : कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ तसेच सहव्याधी असलेल्यांना जास्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत वृद्धांना कोरोनाची लागण कमी प्रमाणात झाल्याचे प्रशासनाने घेतलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. जिल्ह्यात जवळपास ५ लाख ९६ हजार ५२२ ज्येष्ठांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १ हजार ३५८ जण संशयित आढळले असून, केवळ ४० जण कोरोनाबाधित आढळले. पुण्यात ५०२ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४२० ज्येष्ठ नागरिक या सर्वेक्षणात बाधित आढळले आहेत.
राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी असलेल्यांना तसेच ज्येष्ठ व्यक्तींना असल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला होता. त्यामुळे ज्येष्ठांनी सर्वाधिक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्णात ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांना कुठले आजार आहेत यासाठी आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणादरम्यान त्यांची प्रारंभिक तपासणीही करण्यात आली. तसेच त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी त्यांना झिंक तसेच टॉनिकच्या गोळ्यांचे वाटप करण्याच्या सूचना आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्यानुसार सर्वेक्षणासाठी २८०० पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकाने १३ तालुक्यात घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या प्राथमिक तपासण्या केल्या.
या सर्वेक्षणात ६० वर्षांवरील तसेच सहव्याधी असलेले एकूण ५ लाख ९६ हजार ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३ लाख ९७ हजार ८६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १ हजार ३५८ कोरोना संशयित आढळले. त्यानुसार ३६९ जणांचे स्बॅव तपासण्यात आले. या तपासणीत केवळ ४० जण हे कोरोनाबाधित निघाले.
-------------------
सर्वेक्षणासाठी विशेष पथकाची स्थापना
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्णात ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. पुण्यात ५४०, पिंपरी-चिंचवड पालिकेत ३९०, तर जिल्ह्णात २८०० पथकांनी हे सर्वेक्षण घरोघरी जाऊन केले. हे सर्वेक्षण येत्या काही दिवसांत सुरूच राहणार आहे.
----
जिल्ह्यात काही मोजक्याच ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आले होते. मध्यंतरी वाढत्या रूग्णसंख्येमुळे सहव्याधी असलेल्या नागरिकांबरोबरच व्यसनाधीन आणि ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण आम्ही केले. यात आशासेविकांनी मोलाची कामगिरी बजावली. या सर्वेक्षणात ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात आली. यात काहींचे ऑक्सिजन प्रमाण कमी आढळल्याने त्यांची डॉक्टरांकडे तपासणी करण्यात आली. त्यातील मोजकेच लोक बाधित आढळले आहेत. यात आम्ही ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक काळजी घेतली. त्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधे पुरवली. हे सर्वेक्षण पुन्हा काही दिवस सुरू राहणार आहेत.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
----
जिल्ह्णात ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख ९७ हजार ८६७ नागरिकांची तपासणी केली. आणखी १ लाख ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करायची आहे. त्यातून आणखी आकडेवारी स्पष्ट होईल. येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल.
- भगवान पवार,
आरोग्य अधिकारी