ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी रुग्णांना द्यावा लागेल तिसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:45+5:302021-07-08T04:09:45+5:30
कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस व्हेरियंट अल्फा आणि डेल्टाच्या तुलनेत जास्त धोकादायक आहे. त्याच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा अधिक असल्याचे शास्त्रज्ञांचे ...
कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस व्हेरियंट अल्फा आणि डेल्टाच्या तुलनेत जास्त धोकादायक आहे. त्याच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा अधिक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आयसीएमआरने केलेल्या अभ्यासानुसार, कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांमध्ये विषाणूने लसीच्या पहिल्या डोससारखे काम केले. त्यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यावर तो दुसऱ्या डोसप्रमाणे काम करतो आणि इतरांच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट अँटिबॉडी तयार होतात. दुसऱ्या डोसनंतर अँटिबॉडीचे प्रमाण आणखी वाढते. त्यातुलनेत अँटिबॉडी निर्माण होण्यासाठी कोरोनाची लागण न झालेल्या नागरिकांना तीन डोस द्यावे लागू शकतात.
विषाणुजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, ‘डेल्टा प्लस व्हेरियंट रोगप्रतिकारकशक्तीवर हल्ला करतात. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये अँटिबॉडी तयार झालेल्या असतात. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेतल्यावर इतरांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये दुप्पट, तिप्पट अँटिबॉडी तयार होतात. कोरोना होऊन गेल्यानंतर शरीरात मेमरी टी-सेल तयार होतात. त्यामुळे भविष्यात कधीही कोरोनाचा हल्ला झाला तर शरीर विषाणूला लगेच ओळखू शकते. सध्या डेल्टा प्लसबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना तिसऱ्या डोसबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. सुरुवातीला ६० वर्षांहून अधिक वयोगटाच्या व्यक्ती, सहव्याधी असलेले रुग्ण, कॅन्सर, यकृत, मूत्रपिंडाचा आजार असलेले रुग्ण यांना प्राधान्याने तिसरा डोस द्यावा लागू शकतो.’
मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख म्हणाले, ‘सध्याच्या लसीमध्ये अल्फा विषाणूचा स्पाईक प्रोटिन वापरण्यात आला आहे. लसीच्या माध्यमातून स्पाईक प्रोटिन शरीरात गेल्यावर त्याविरोधात अँटिबॉडी विकसित होतात. डेल्टा, डेल्टा प्लसमध्ये स्पाईक प्रोटिनचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे लसींची परिणामकारकता कमी होऊ शकते. त्यामुळे पुढील वर्षभरात नवीन व्हेरियंटमधील स्पाईक प्रोटिन वापरून नवीन लस बाजारात आणावी लागेल किंवा सध्याच्या लसीचे तीन डोस द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण यांना प्राधान्याने तिसरा डोस द्यावा लागेल. कोरोना होऊन गेलेल्या लोकांना एकच डोस पुरेसा आहे, असे पत्र शासनाला यापूर्वीच लिहिले आहे. मात्र, त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही.’
-------------------------
..अन्यथा तिसरी लाट मानवनिर्मित असेल!
ब्रिटनमध्ये ६० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यावरही उर्वरित ४० टक्के लोकांमध्ये तिसरी लाट आली. आपल्याकडे सरासरी २० टक्केच लसीकरण झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची दाट शक्यता आहे. मात्र, तिसरी लाट विषाणूनिर्मित नव्हे, तर मानवनिर्मित असेल, असा इशारा डॉ. देशमुख यांनी दिला आहे. कोरोनाची साथ गेल्याप्रमाणे लोकांचा वावर सुरू झाला आहे. कोरोना प्रतिबंधक वर्तनाचे अजिबात पालन होताना दिसत नाही. त्यामुळे विषाणूऐवजी लोकच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.