आपल्याच घरात ज्येष्ठ नागरिक उपरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:51 AM2018-07-25T01:51:45+5:302018-07-25T01:52:19+5:30
पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात अवहेलना
- सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : महिन्याला एक लाख पगार घेणारा आयटी क्षेत्रातील मुलगा आपल्या आईला खर्चासाठी महिन्याला ५०० रुपये देईल म्हणतो... आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून उच्च शिक्षण दिलेल्या मुलाला पुण्यात असलेल्या आपल्या माता-पित्यांना भेटण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी वेळ नाही... आयुष्यभराची पुंजी खर्च करून बांधलेल्या घरातून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या वडिलांना घराबाहेर काढले जाते. अशी एक ना अनेक प्रकरणे दररोज पुण्यात ज्येष्ठ नागरिक हक्क कायद्यांतंर्गत हवेली प्रांत अधिकारी यांच्याकडे दाखल होत आहेत.
पैसा आणि संपत्तीपुढे येथे नाती फिकी पडू लागली असल्याचे हवेली प्रांत कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाची स्थापन केली असून, यांच्या न्यायाधिकरणासाठी पीठासन अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
मुलांकडून त्रास दिला जातो, मूल संभाळ करत नाही, मुला-मुलींनी सर्व मालमत्ता, घर ताब्यात घेतले... अशा एक ना अनेक तक्रारी यामुळे सध्या पुणे शहर आणि हवेली तालुक्यातून प्रांत अधिकाऱ्यांकडे दाखल होत आहेत. पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत गेल्या तीन-चार महिन्यांत या कायद्याअंतर्गत १६३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी एकट्या पुणे शहर आणि हवेली तालुक्यात ६८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. उच्चशिक्षित, समाजात मान, प्रतिष्ठा असलेली मुले-मुली स्वत:च्या कमाईतून आई-वडिलांची काळजी तर घेतच नाहीत, उलट त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी त्यांचा छळ करतात, अशा मन सुन्न करणाºया घटनादेखील घडत आहेत.
शहरात ६८ ज्येष्ठ माता-पित्यांच्या तक्रारी
पुणे शहर आणि हवेली तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत ६८ प्रकरणे दाखल झाली. यात २६ प्रकरणांमध्ये सुनावणी घेऊन आदेशदेखील देण्यात आले. तर प्रलंबित ४२ प्रकरणांपैकी ५ प्रकरणांमध्ये कार्यालयात सुनावणी सुरू आहे. तर शिल्लक ३७ प्रकरणे समेटकर्ता अधिकारी यांच्याकडे समेटासाठी प्रलंबित आहेत.
...अन् त्या आईला दहा हजार मिळू लागले
आयटी कंपनीत लाख रुपये पगार घेणारा मुलगा आपल्या आईचा संभाळ करत नाही. यामुळे आईने ज्येष्ठ नागरिक हक्क कायद्याअंतर्गत प्रांत अधिकाºयांकडे तक्रार दाखल केली. प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. या वेळी अधिकाºयांनी मुलाला विचारले, की आईला महिन्याला किती पैसे देऊ शकता. थोडाही विलंब न लावता मुलाने ५०० रुपये सांगितले. यावर अधिकाºयांनी तुमच्या घरी कामाला येणारी बाई तरी दोन हजाराच्या खाली पैसे देता का, असे सुनवत या वयात आईचे राहणे, औषधोपचार ५०० रुपयांत कसे शक्य होईल. यामुळे प्रांत अधिकाºयांनी दहा हजार रुपये देण्याचे आदेश केले.
शहरात परिस्थिती गंभीर
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविताना पीठासन अधिकारी म्हणून काम करताना शहरात ज्येष्ठ नागरिकांचा, वृद्ध माता-पिता यांचे प्रश्न खूपच गंभीर होत असल्याचे जाणवले. यात दररोज एक-दोन प्रकरणे दाखल होतात. वृद्ध आई-वडिलांच्या खूपच माफक अपेक्षा असतात. परंतु आयुष्यभर रक्ताचे पाणी करून वाढवलेल्या, शिक्षण दिलेल्या मुलांना आई-वडिलांविषयी काहीच वाटत नाही, हे पाहून, ऐकून मन सुन्न होते. -ज्योती कदम, हवेली प्रांत अधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक पीठासन अधिकारी