दौंड नगर परिषदेत ज्येष्ठ नगरसेवकांची खडाजंगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:52 PM2019-08-21T12:52:32+5:302019-08-21T12:53:25+5:30

‘तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना’ हा  कटारिया आणि शेख यांचा फॉर्म्युला सभागृहातील दोन्ही गटातील  नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून माहीत आहे...  

Senior corporators quarrel in the Daund nagar parishad | दौंड नगर परिषदेत ज्येष्ठ नगरसेवकांची खडाजंगी 

दौंड नगर परिषदेत ज्येष्ठ नगरसेवकांची खडाजंगी 

googlenewsNext
ठळक मुद्देओपन स्पेसवरून विशेष सभेत वादावादी

दौंड : दौंड नगर परिषदेच्या विशेष सभेत ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख यांच्यात स्टेडियमच्या परिसरातील  ओपन स्पेसच्या संदर्भात खडाजंगी झाली.  यावेळी सभागृहात तणावाचे वातावरण झाले होते. दोघांनीही एकमेकांकडे हातवारे करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी नगर अध्यक्ष शीतल कटारिया मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्यासह दोन्ही गटातील नगरसेवक उपस्थित होते. 
   स्टेडियमच्या इनडोअरच्या सुधारित अंदाजपत्रकाचा विषय सभागृहात सुरू असताना गटनेते बादशाह शेख म्हणाले की, स्टेडियमच्या परिसरातील मोठ्या लेआऊटमधील (जिजामातानगर) ओपनस्पेस संबंधित मालकाकडूनदुय्यम निबंधकांसमोर अधिकृत दस्ताने घ्यायचे राहिलेली कारवाई प्रथम करा. कारण ती जागा नागरिकांना सोयीची आहे.  यावेळी बादशाह शेख यांच्या मुद्द्याला हरकत घेत प्रेमसुख कटारिया म्हणाले,  हा  विषय अजेंड्यावर नाही.  त्यामुळे हा विषय चर्चेत घेता येणार नाही. यावर बादशाह शेख म्हणाले, मी नगराध्यक्षांची  परवानगी घेऊन बोलत आहे. तुम्ही मला बोलण्यास मज्जाव करू नका. असे म्हणत दोघात शाब्दीक खडाजंगी झाली. एकमेकावर दोघेही हातवारे करीत असताना  सभागृहातील वातावरण तणावपुर्ण झाले होते. 
  मात्र, यावेळी नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी हस्तक्षेप करून या दोघांनाही शांत केले.  या विशेष सभेच्या सुरुवातीला नवीन साठवण तलाव ते जलशुद्धी केंद्रापर्यंत गुरुत्ववाहिनी टाकण्याचा विषय सुरू झाला. तेव्हा नगरसेवक  इंद्रजित जगदाळे म्हणाले की गुरुत्ववाहिनी टाकण्याच्या कामासाठी वनखात्याची परवानगी घेतली नव्हती. तेव्हा बजेटमध्ये तरतूद करा आणि नंतरच निर्णय घ्या.
       बादशाह शेख म्हणाले, की याबाबत फेरनिविदा काढा दरम्यान प्रेमसुख कटारिया म्हणाले की, पाणी पुरवठ्यासंदर्भातील विषय आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तेव्हा पाणी पुरवठ्याबाबतचे काम रेंगाळत ठेवायचे की तातडीने करायचे, याचा विचार झाला पाहिजे. 
   यावर मुख्याधिकारी मंगेश शिंदे म्हणाले की, संबंधित ठेकेदार आहे. त्या परिस्थितीत जुन्या रेटने काम करायला तयार असेल तर  ठीक नाही तर  फेरनिवीदा काढू असे शिंदे म्हणाले. विषय पत्रिकेकेवरील सर्वच विषय या सभेत मंजूर करण्यात आले. 
    नगरसेवक जीवराज पवार, नगरसेवक गौतम साळवे यांनी चर्चेत भाग घेतला होता.
......
सभागृहात ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख यांच्यात हातवारे करीत शाब्दिक खडाजंगी सुरु होती. 
दरम्यान मुख्याधिकारी मंगेश शिंदे आणि काही अधिकारी  नगर परिषदेत नव्याने आलेल्या आहेत. तेव्हा त्यांना शेख आणि कटारिया यांचे साटेलोटे माहीत नसल्याने परिस्थिती भयानक वाटली. परिणामी हाणामारी होती की काय? असे वाटले होते. परंतु, विशेषसभा संपल्यानंतर उपस्थित नवीन अधिकारी मंडळीचा जीव भांड्यात पडला. 
‘तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना’ हा  कटारिया आणि शेख यांचा फॉर्म्युला सभागृहातील दोन्ही गटातील  नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून माहीत आहे.  तेव्हा दोन्ही गटातील नगरसेवकांना शेख-कटारिया  या दोघांचा कलगीतुरा गमतीचा वाटत असल्याचे सभागृहातील चित्र होते. 

Web Title: Senior corporators quarrel in the Daund nagar parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे